Bharat Jodo Yatra : ..धडाकेबाज झाली असती भारत जोडो यात्रा, पण राहुल गांधींनी केल्या 'या' चुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bharat Jodo Yatra

Bharat Jodo Yatra : ..धडाकेबाज झाली असती भारत जोडो यात्रा, पण राहुल गांधींनी केल्या 'या' चुका

Bharat Jodo Yatra : कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेचा' आज समारोप होणार आहे. ही यात्रा 14 राज्यांमधून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

सुमारे 146 दिवसांच्या प्रवासात राहुल गांधींनी 4 हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. आज श्रीनगरमध्ये ही यात्रा समाप्त होणार आहे. या यात्रेमुळे राहुल गांधींची वेगळी छबी देशातील जनतेसमोर येण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, या यात्रेदरम्यान, काही वादाचे मुद्देदेखील उपस्थित झाले. त्यामुळे याचा फटकादेखील राहुल गांधी आणि काँग्रेसला बसू शकतो. हे वादाचे मुद्दे नेमके काय होते हे आपण पाहणार आहोत.

1) वीर सावरकरांवर केले विधान

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींनी वीर सावरकरांवर इंग्रजांना मदत केल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर, पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकरांचे पत्रही दाखवले. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन राज्यासह देशभरात चांगलाच गदारोळ झाला होता.

2) राहुल गांधींची तुलना प्रभू रामाशी

भारत जोडो यात्रा यूपीमध्ये पोहोचण्यापूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू रामाशी केली. यानंतर हिंदू संघटनांनीही जोरदार निदर्शने केली होती.

3) 'हा देश संन्याशांचा आहे, पुरोहितांचा नाही..'

राहुल गांधींची यात्रा हरियाणातून पुढे जात असताना राहुल गांधींनी केलेले आणखी एक विधान वादात सापडले. यावेळी त्यांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला होता. काँग्रेसचा तपस्यावर विश्वास आहे, मात्र भाजप ही पूजा करणारी संस्था आहे. हा देश संन्याशांचा आहे, पुरोहितांचा नाही असे विधान राहुल गांधींनी केले होते.

4) राहुल गांधींच्या टी-शर्टवरून राजकारण

आतापर्यंत राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत होते. मात्र, राहुल गांधी दिल्लीत पोहोचताच त्यांच्या टी-शर्टदेखील वादात सापडला होता. कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी केवळ टी-शर्ट परिधान केलेले दिसले होते. यावरून भाजपने राहुल गांधींना ट्रोल केले होते.

5) सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरून झाला वाद

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मूमध्ये एक विधान करून काँग्रेससह राहुल गांधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सिंह यांनी भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

दिग्विजय सिंह यांच्या या वक्तव्यानंतर राहुल गांधीना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. सिंह यांच्या विधानानंतर देशभरातून प्रतक्रिया उमटल्या होत्या.

२०२४ मध्ये कसा आणि किती होणार फायदा?

काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज संपणार आहे. त्यात २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून, या यात्रेचा राहुल गांधींना आणि काँग्रेसला फायदा होऊ शकतो असे भाकित काही जाणकार व्यक्त करत आहेत.

मात्र, देशातील विरोधकांना एकत्र आणण्यास काँग्रेस आणि राहुल गांधी कितपत यशस्वी होऊ शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.