Bharat Jodo Yatra : काश्मीरमध्ये समारोपाच्या भाषणात राहुल गांधी काय म्हणाले? जाणून घ्या १० मुद्दे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra : काश्मीरमध्ये समारोपाच्या भाषणात राहुल गांधी काय म्हणाले? जाणून घ्या १० मुद्दे...

Bharat Jodo Yatra : काश्मीरमध्ये समारोपाच्या भाषणात राहुल गांधी काय म्हणाले? जाणून घ्या १० मुद्दे...

श्रीनगरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जो़डो यात्रेचा शेवट केला. यावेळी बर्फवृष्टी होत असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, तसंच भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. या समारोपाच्या भाषणामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी खालील मुद्दे मांडले-

१. जे लोक हिंसा करतात, घडवून आणतात, ते हिंसेचं दुःख समजू शकत नाहीत. मी हे दुःख समजू शकतो, कारण अनेकदा हे दुःख मी भोगलं आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये जे शहीद झाले, त्यांच्या घरच्यांवर जी परिस्थिती लोटली आहे, ती पंतप्रधान मोदी, अमित शाह समजू शकणार नाही. मी समजू शकतो. मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हाच माझ्या आजीचा मृत्यू झाला. शाळेत जेव्हा फोन आला तेव्हा माझे हात पाय कापत होते. जेव्हा मी अमेरिकेत होतो, तेव्हा एक फोन आला आणि सांगण्यात आलं की माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. मला वाटतं असे फोन कोणाच्याही घरी येऊ नयेत.

२. माझ्या आधी प्रियंका गांधी असं काही बोलल्या की माझ्या डोळ्यात पाणीच आलं. प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की काश्मीरला पोहोचण्याआधी राहुल गांधी यांनी मला आणि सोनिया गांधींना फोन करुन सांगितलं की त्यांना विचित्र वाटत आहे. त्यांना असं वाटतंय की ते आपल्या घरी जात आहेत. जेव्हा ते काश्मीरच्या लोकांना भेटतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होते.

३. राहुल गांधी म्हणाले, "मी गांधीजींकडून शिकलो आहे की जगायचं असेल, तर न घाबरता जगा. मी चार दिवस इथे पायी चाललो. मी फक्त हाच विचार केला की, बदला माझ्या पांढऱ्या टी-शर्टचा रंग, लाल करून टाका. पण मी जो विचार केला होता, तेच झालं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिलं नाही, तर प्रेम दिलं. मोठ्या मनाने प्रेम केलं, आपलं मानलं, प्रेमाने, अश्रूंनी माझं स्वागत केलं. "

४. भाजपा, आरएसएसचे लोक मला शिव्या देतात, मी त्यांचे आभार मानतो. ते जेवढं प्रेशर टाकतील, तेवढं मी शिकत राहीन.

५. मी जेव्हा कन्याकुमारीहून पुढे जाऊ लागलो, तेव्हा मला थंडी वाजत होती. तेव्हा मी काही मुलं पाहिली. ती गरीब होती, त्यांना थंडी वाजत होती, ते मजुरी करत होते, थंडीने कुडकुडत होते. मी विचार केला की थंडीमध्ये ही मुलं स्वेटर-जॅकेट घालू शकत नाहीयेत, तर मीही घालू शकत नाही.

६. राहुल गांधी म्हणाले, "कॉलेजच्या दिवसांमध्ये फुटबॉल खेळत असताना माझ्या गुडघ्याला लागलं होतं, पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान ती दुखापत पुन्हा उफाळून आली, दुखणं वाढलं. यात्रा करणं अवघड वाटू लागलं. पण नंतर एक चिठ्ठी आली आणि त्या दिवशी दुखणं पूर्णपणे दूर झालं."

७. मी कायम सरकारी घरांमध्ये राहिलेलो आहे. माझ्याकडे स्वतःचं घर नाही. माझ्यासाठी घर एक इमारत नाही तर आयुष्य जगण्याची पद्धत आहे. ज्याला आपण काश्मिरीयत म्हणतो, त्याला मी माझं घर मानतो.

८. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले,"ही यात्रा निवडणूक जिंकण्यासाठी किंवा काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी नाही, तर द्वेषाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काढण्यात आली आहे. भाजपाने काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं आहे, पण आम्ही काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ."

९. प्रियंका गांधी सभेत बोलताना म्हणाल्या, "आज देशात जे राजकारण सुरू आहे, त्याने देशाचं भलं होणार नाही. हे तोडण्याचं विभागण्याचं राजकारण आहे. माझी अपेक्षा आहे की हा द्वेष संपून जाईल आणि प्रेम सर्वांना जोडून ठेवेल. कन्याकुमारीपासून श्रीनगर पर्यंत जिथे जिथे ही यात्रा गेली, तिथे तिथे या यात्रेला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळालं. कारण देशात आता संविधानासाठी, या पृथ्वीसाठी प्रेम आहे, उत्साह आहे."

१०. राहुल गांधी पुढे म्हणाले, "एका बाजूला काँग्रेसचा दृष्टीकोन आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपा आणि आरएसएसचा अहंकार आहे, द्वेषाचा दृष्टीकोन आहे."