Bharat jodo yatra : लोकशाही वाचवली म्हणून मोदी पंतप्रधान ; काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mallikarjun Kharge

Bharat jodo yatra : लोकशाही वाचवली म्हणून मोदी पंतप्रधान ; काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

नांदेड : पंतप्रधान मोदी नेहमीच विचारतात, काँग्रेसने काय केले? आम्ही ७० वर्षांत संविधान वाचवले. लोकशाही वाचवली. त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

येथे गुरुवारी ‘भारत जोडो’ यात्रेनिमित्त झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. खर्गे म्हणाले, ‘आज जो काही विकास दिसत आहे, तो काँग्रेसनेच केला. पण, भाजपकडून समाजात द्वेष, जातीत भांडणे लावण्याचे काम होत आहे. नेहरूंनी सांगितलेल्या विविधतेत एकतेची आज गरज आहे. त्यासाठी राहुल गांधींनी ही यात्रा हातात घेतली. मोदी विचारतात काँग्रसेने काय केले? काँग्रेसने केले ते विकण्याचा सपाटा मोदींना लावला आहे. सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी सांगितले होते की दरवर्षी दोन कोटी जणांना रोजगार देऊ. सत्तेत येऊन नऊ वर्ष झालीत. त्यांनी दाखवावे की १८ कोटी जणांचा रोजगार कुठे गेला? सध्या ३० लाख सरकारी जागा रिक्त आहेत. पण, या सरकारने काल-परवा ७५ हजार नियुक्तीपत्रे दिली. एवढ्या नोकऱ्या असताना केवळ ७५ हजार नोकऱ्या दिल्या म्हणून स्वतःची पाठ थोपटत आहेत. युवकांची ही फसवणूक आहे’’

कुणाला भीती घालायची नाही आणि कुणाला भ्यायचेही नाही, असा निर्धार करा. पण, ते घाबरवून टाकत आहेत. भीतीने काही खासदार, आमदार तिकडे पळत आहेत, असेही ते म्हणाले.

लोकसेवेसाठी राहुल यांनी नाकारले पद

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून आम्हाला तुमच्या नेतृत्वात काम करू द्या, अशी विनंती राहुल गांधी यांना सातत्याने करत होतो. परंतु, मला लोकांच्या सेवेसाठी वेळ द्यायचा आहे, अशी भूमिका घेत त्यांनी पद नाकारल्याचे स्पष्टीकरण खर्गे यांनी दिले. त्याग हा गांधी कुटुंबीयांच्या रक्तात आहे. २००४ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारावे म्हणून आम्ही सर्व नेते सोनिया गांधी यांना विनंती करीत होतो. मात्र, यास सपशेल नकार देत त्यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान बनवले. त्यांना पदाची भूक नाही तर जनतेची सेवा करायची आहे. म्हणून ते कायम तसी प्रयत्नरत असतात, असेही ते म्हणाले.

आता वैयक्तिक सूड उगवला जातोय ः अशोक चव्हाण

‘‘मला नितीन गडकरी यांचे कौतुक वाटते. कारण, त्यांनी मनमोकळ्यापणाने मनमोहन सिंग यांच्या अर्थव्यवस्थेच्या निर्णयाची पाठराखण केली. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे. पण, आता वैयक्तिक सूड उगवला जातोय. एकमेकांचे गळे कापण्याचे आणि नेत्यांना संपवण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. याप्रसंगी मला आर. आर. पाटील यांची प्रकर्षाने आठवण येते; कारण त्यांनी तंटामुक्ती आणून गावागावातील भांडणे संपवली. आज देशातील तंटामुक्त करण्याची गरज निर्माण झाली. सध्या देशात गलिच्छ राजकारण होत आहे. सामान्य माणसात राजकीय नेत्यांबद्दल खूप वाईट प्रतिमा निर्माण केल्या जात आहे. सर्वांना एकत्र आणून लोकशाही टिकविण्याचे काम करण्याची गरज आहे आणि भारत जोडोच्या माध्यमातून ही लोकशाही जपण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे, देश घडवायचा आहे’’, अशी भावनाही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

त्यांचा ‘इव्हेंट’चा, आमची ‘मूव्हमेंट’ ः नाना पटोले

‘‘मोदींचे काम ‘इव्हेंट’चे तर राहुल यांचे ‘मूव्हमेंट’चे आहे. आम्ही चळवळीच्या माध्यमातून या देशाला एकसंध ठेऊ. कधीएकेकाळी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले लोक राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सहभागी होत आहेत. आपल्या देशाची युवापिढी शरीराने सुदृढ असेल तर या देशाला अधिक सक्षम करता येईल आणि राहुल गांधी हा संदेश या यात्रेतून देत आहेत. गांधी परिवाराने या देशासाठी दोन बलिदान दिले आहे. त्यांचा त्याग मोलाचा आहे. नरेंद्र मोदी जिथे जातील तिथे इव्हेंट करतात. आपल्या आईला भेटायला गेले असताना पाया पडताना ते कॅमेऱ्याकडे पाहतात. पण, यात्रेदरम्यान आईच्या बुटाचे बंध बांधून देताना राहुल केवळ आईच्या चरणाकडे पाहतात. हे आमचे संस्कार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून या देशाला जोडण्याचे काम आम्ही करत राहू’’, असेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

परिवर्तनाची दिशा : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आम्हाला या यात्रेत पाठवले. प्रकृतीच्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचा यात्रेला पाठिंबा आहे. जगाला नागरी सभ्यता आपल्या देशाने शिकवली. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आणि या देशात प्रजासत्ताक युग आणले. २०१४ नंतर ‘गंगा जमुनी’ तहजीबला सुरुंग लावण्याचे काम सुरू झाले. धर्माधर्मात, जातिजातीत तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहे. महात्मा गांधी यांनी मूठभर मीठ उचलून ब्रिटिश साम्राज्याचा पाया मोडला. आज भारत जोडो याच परिवर्तनाचा एक मुख्य प्रवाह आहे.’’

स्वातंत्र्याची दुसरी लढाई ः बाळासाहेब थोरात

‘‘ही यात्रा म्हणजे ऐतिहासिक घटना आहे. भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी तिची नोंद घेतली जाणार आहे. या यात्रेचा मोठा फरक पडणार आहे. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. पण, पहिला प्रश्न लोकशाही वाचवण्याचा आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. या यात्रेचा निश्चित फरक पडेल’’, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.