पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन 

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

देशातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत सोमवारी (ता. 28) निधन झाले.

मुंबई : देशातील पहिल्या महिला पोलिस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत सोमवारी (ता. 28) निधन झाले.

दरम्यान, मुंबई येथील रूग्णालयात त्यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली आहेत. चौधरी या १९७३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी  होत्या. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. २००४ ते २००७ या काळात त्या उत्तराखंड पोलिस दलात महासंचालक पदावर होत्या. 

भट्टाचार्य यांनी देशातील  पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान २००४ मध्ये पटकावला होता. त्यावेळी त्या उत्तराखंड पोलीस दलाच्या प्रमुख होत्या. किरण बेदी यांच्यानंतर देशातील त्या दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. भट्टाचार्य या नारायणदत्त तिवारी मुख्यमंत्री असताना पोलीस महासंचालक झाल्या व २००७ मध्ये त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी हरिद्वार येथून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. 

दरम्यान, ३३ वर्षांच्या सेवेत त्यांनी बॅडमिंटनपटू सईद मोदी  मृत्यू प्रकरण, रिलायन्स -बॉम्बे डाइंग प्रकरण यात तपास केला होता. त्याआधी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातही काम केले. १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक मिळाले. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राजीव गांधी पुरस्कारही मिळाला होता. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhattacharya, the first woman DGP in the country, passed away