
देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना 15 जुलैपासून मोफत बूस्टर डोस
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाच्या नव्याने वाढ होत असताना सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. या 75 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत सरकारी लसीकरण केंद्रांवर कोविड लसीचे बूस्टर डोस मोफत दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन देण्यासाठी अमृत महोत्सवाच्या रूपात ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona Booster News In Marathi)
देशात 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकांना प्रतिबंधात्मक डोस द्यायचा आहे. त्यापैकी 1 टक्क्यांहून कमी लोकांना आतापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. तथापि, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील अंदाजे 160 दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 26 टक्के तसेच आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस मिळाला आहे.
हेही वाचा: US Open अन् जोकोविचच्या आडवी येणार 'कोरोना' लस?
दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दोन्ही डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंडाची पातळी सुमारे सहा महिन्यांनी कमी होत आहे. अशा परिस्थितीत बूस्टर किंवा सावधगिरीचा डोस दिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सरकारने 75 दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत 18 ते 59 वयोगटातील लोकांना सरकारी केंद्रांवर कोरोनाचा मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
गेल्या आठवड्यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या दुसऱ्या डोसमधील अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (NTAGI) शिफारशीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला होता.
Web Title: Big Decision Free Covid Precaution Doses For 18 59 Age Group From July 15 At Govt Centres
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..