चिंता वाढली! नवीन कोरोनाबाधित आढळण्याचा दर तब्बल इतक्या टक्क्यांनी वाढला 

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ताज्या अहवालानुसार, 20 जून ते 29 जून दरम्यान कोरोना संसर्गाच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे.

नवी दिल्ली- गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ताज्या अहवालानुसार, 20 जून ते 29 जून दरम्यान कोरोना संसर्गाच्या दरात मोठी वाढ दिसून आली आहे. 20 जून रोजी पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) म्हणजे चाचणी घेण्यात आलेल्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी पॉझिटिव्ह निघाल्यांचा दर 7.64 टक्के होता, तो 29 जून रोजी वाढून 11.40 टक्के झाला आहे. म्हणजेच 20 जून ते 29 जूनपर्यंत कोरोनाबाधितांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.

मोठी बातमी! जुलैमध्ये सुरु होणार नाहीत शाळा; संसर्ग कमी होईपर्यंत शाळांना.
20 जून रोजी पॉझिटिव्हिटी दर 7.64 टक्के होता. त्यानंतर 21 जून रोजी 8.08 टक्के, 22 जून रोजी 7.94 टक्के, 24 जून रोजी 8.14 टक्के, 26 जून रोजी 8.41 आणि 29 जून रोजी पॉझिटिव्हिटी दर 11.40 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. याचा अर्थ गेल्या 10 दिवसांपासून तपासणीसाठी आलेल्या एकूण नमुण्यांपैकी पॉझिटिव्ह आढळणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता पॉझिटिव्हिटी दरही वाढत असल्याने भारतीयांची चिंता वाढणार आहे.

गेल्या 24 तासात कोरोनाचे 19,459 नवीन केसेस समोर आले आहेत, तर 380 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. भारतात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5,48,318 झाली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 3,21,723 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनो संसर्गातून बरे होणाऱ्यांचा दर 58.67 टक्के झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

संसर्ग वाढल्यास पुन्हा लॉकडाउन - उद्धव ठाकरे
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी एका दिवसात 20 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत जगात भारताचा चौथा  क्रमांक आहे. अमेरिका कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. एकट्या अमेरिकेत आतापर्यंत 26 लाख कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, तर 1 लाख 28 हजार जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ब्राझिल आणि रशिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. देशातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेतात भारत लवकरच रशिया मागे टाकण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big increase in positivity rate in last 10 days