दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जैशच्या 2 दहशतवाद्यांना अटक, स्फोटकांचा साठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक जण जम्मू-काश्मीरमधील बारामुला आणि दुसरा कुपवाडा येथे राहणारा आहे.

नवी दिल्ली- देशभरात उत्साहात दिवाळी साजरी केली जात असतानाच दिल्ली पोलिसांनी एक जबरदस्त कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा या दोघांचा कट होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात आला आहे. 

अटक करण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक जण जम्मू-काश्मीरमधील बारामुला आणि दुसरा कुपवाडा येथे राहणारा आहे. पोलिसांना त्यांना सरायकाले खां नजीक अटक केले. दोघांकडून मोठ्याप्रमाणत स्फोटके आणि दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. 

हेही वाचा- शपथविधीवेळी नितीशकुमार यांच्याकडून मोठी चूक, पुन्हा घेतली शपथ

या दोघांनी दिल्ली-एनसीआर येथील अनेक ठिकाणांवर हल्ल्याचा कट रचल्याचे चौकशीत समजले. त्यांच्या निशाण्यावर अनेक व्हीआयपी व्यक्ती होते. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन सेमीऑटोमॅटिक पिस्टर आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. दिल्लीत मोठा हल्ला करण्याचा त्यांचा कट असल्याचे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. 

हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी गटात सामील झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत होते. अनेकवेळा सीमा पार करुन जाण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. सीमेवर भारतीय जवानांच्या कडक सुरक्षेमुळे ते सातत्याने अपयशी ठरले होते. 

या दोघांबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. दोन्ही दहशतवादी हे 20 ते 22 वयोगटाचे आहेत. या दोघांची कसून चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: big terrorist attack plot in delhi failed two suspected militants arrested