बिहारच्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Agriculture Minister Sudhakar Singh

बिहारच्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा

पाटणा : वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे, वाद ओढवून घेणारे बिहारचे कृषी मंत्री सुधाकर सिंह यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष आणि सुधाकर सिंह यांचे वडील जगदानंद सिंह यांनी याबाबत रविवारी माहिती दिली. सुधाकर सिंह यांनी मात्र राजीनामा दिल्यानंतर माध्यमांसमोर यायचे टाळले. ‘सुधाकर सिंह हे शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बोलत होते, त्यांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला, परंतु कधीकधी इतकेच पुरेसे नसते, त्यामुळे त्यांनी आज मंत्रिपद देखील सोडले आहे,’ असे जगदानंद सिंह यांनी माध्यमांना सांगितले.

नितीश सरकारमध्ये राजदच्या कोट्यातून कृषिमंत्री झालेल्या सुधाकर यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे न देता उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे सोपविला आहे. सुधाकर यांनी काही दिवसांपूर्वीच कृषी विभागातील अधिकाऱ्यांना चोर संबोधत, स्वतःला चोरांचा सरदार म्हटले होते. यावरून बिहारमध्ये विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सुधाकर सिंह यांनी अनेकदा नितीश यांच्या निर्णयांना उघडपणे विरोध देखील केला होता.

भाजपकडून पाठराखण

बिहार मधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुधाकर सिंह यांची पाठराखण केली आहे. ‘सिंह यांनी सरकारी बाबूंच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवला होता, मात्र नितीश यांना ते सहन झाले नाही त्यामुळे सिंह यांना राजीनामा द्यावा लागला,’ असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जैस्वाल यांनी केला आहे.