esakal | बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार
sakal

बोलून बातमी शोधा

modi nitish kumar.jpg

यापूर्वी भाजप आणि जदयू यांनी 2010 मध्ये विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली होती.

बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे. 

भाजपला 121 जागा मिळाल्या आहेत. भाजप आपल्या कोट्यातून मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीला 9 जागा देणार आहे. अशा पद्धतीने भाजप 112 जागांवर राज्यात निवडणूक लढणार आहे. मंगळवारी (दि.6) पाटणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जागा वाटपाची घोषणा केली. 

नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप निवडणूक लढवून सरकार स्थापन करेल. यामध्ये कोणतीच शंका नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल म्हणाले

तत्पूर्वी, सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बिहार कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्रसिंह यादव यांनी सहभाग नोंदवला होता. 

हेही वाचा- गृहमंत्र्यांच्या फडणवीसांवरील टीकेला प्रवीण दरेकरांनी दिले प्रत्युत्तर

2010 मध्ये लढले होते एकत्र

यापूर्वी भाजप आणि जदयू यांनी 2010 मध्ये विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली होती. त्यावेळी जदयू 141 आणि भाजप 102 जागांवर उभे होते. त्यावेळी जदयूला 115 तर भाजपला 91 जागांवर विजय मिळवला होता. 

दरम्यान, बिहारमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी होईल. मतमोजणी 10 नोव्हेंबर रोजी घोषित होईल.