esakal | 7 दिवसांचा मुख्यमंत्री, दोनवेळा राजीनामा; नितीश कुमार यांचा सातव्यांदा शपथविधी
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गेल्या 15 वर्षांत त्यांनी सहावेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

7 दिवसांचा मुख्यमंत्री, दोनवेळा राजीनामा; नितीश कुमार यांचा सातव्यांदा शपथविधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटणा - नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची सातव्यांदा शपथ घेतली. गेल्या 20 वर्षात त्यांनी सातव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. नितीश कुमारांची पहिली कारकिर्द ही फक्त सातच दिवसांची होती. त्यानंतर आता नितीश कुमार सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गेल्या 15 वर्षांत त्यांनी सहावेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

नितीश कुमार पहिल्यांदा तीन मार्च 2000 मध्ये मुख्यमंत्री झाले होते. मात्र बहुमत नसल्यानं त्यांचे सरकार केवळ 7 दिवस टिकू शकले. त्यानंतर बिहारमध्ये राजदचं सरकार आलं होतं. नितीश कुमार यांनी दुसऱ्यांदा 24 नोव्हेंबर 2005 ला शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत नितीश कुमार मुख्यमंत्रीपदी राहिले आहेत. 2010 मध्ये एनडीएच्या सरकारने नितीश कुमार यांच्या नेतृ्त्वाखाली बहुमत मिळवलं होतं. त्यावेळी एनडीएला तब्बल 206 जागा मिळाल्या होत्या.

2010 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र बहुमत असलेल्या एनडीएसाठी हा कार्यकाळ फारसा अनुकूल नव्हता. ते एनडीएतून बाहेर पडले आणि बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री म्हणून पुन्हा विराजमान झाले. 2014 मध्ये जदयूने लोकसभेत स्वतंत्र निवडणूक लढवली. जदयूच्या पराभवामुळे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जीतनराम मांझी यांच्याकडे जबाबदारी सोपवली.

हे वाचा - Bihar Election : नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री मात्र एकदाही विधानसभेवर नाही

राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे नेते आणि आमदारांच्या गटाने नितीश कुमार यांना पुन्हा चौथ्यांदा 22 फेब्रुवारी 2015 मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. 2015 च्या निवडणुकीत जदयूने राजत आणि काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली. महाआघाडीला 178 जागा मिळाल्या. त्यानंतर पाचव्यांदा नितीश कुमार यांनी 20 नोव्हेंबर 2015 ला बिहारच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. मात्र राजदसोबतच्या मतभेदांमुळे त्यांनी पुन्हा राजीनामा दिला.

महाआघाडीतून बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार यांना भाजपने साथ दिली आणि एनडीएने सरकार स्थापन केलं. यावेळी सहाव्यांदा त्यांनी 27 जुलै 2017 ला बिहारचं नेतृ्त्व सीकारलं. आता भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवल्यानंतर एनडीएला बहुमत मिळालं. पण जदयूला कमी जागा मिळाल्याने नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अखेर नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतल्याने सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला.

loading image