Bihar Election : नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री मात्र एकदाही विधानसभेवर नाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

तुम्हाला माहीतेय का की, नितीश कुमार हे तीनवेळा मुख्यमंत्री असताना कधीच जनतेतून निवडून गेलेले नाहीयेत.

पाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील माहोल गरमागरम आहे. अद्याप तिसऱ्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. तीनवेळा मुख्यमंत्री राहीलेल्या नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनने तगडे आव्हान दिले आहे. पण तुम्हाला माहीतेय का की, नितीश कुमार हे तीनवेळा मुख्यमंत्री असताना कधीच जनतेतून निवडून गेलेले नाहीयेत. हो. हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल पण तीनवेळा मुख्यमंत्री म्हणून बिहारची सत्तेवर विराजमान असणाऱ्या नितीश कुमार हे विधानपरिषदेतून आमदार आहेत.

नितीश कुमार यांनी सहा सलग लोकसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत आणि त्या जिंकल्याही आहेत. पण, मुख्यमंत्री म्हणून ते कधीच जनतेतून निवडून आलेले नाहीयेत.  बिहार विधानसभेची हाय-व्होल्टेज निवडणूक सध्या सुरु असून या निवडणुकीत नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष भाजपासोबत युती करुन पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्यादेखील नितीश कुमार हे बिहारच्या विधानपरिषदेतून आमदार म्हणून नियुक्त आहेत. 

हेही वाचा - बिहार निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल! तरुण चेहऱ्यांना संधी

बिहार हे देखील भारतातील त्या मोजक्या सहा राज्यांमध्ये मोडते ज्या राज्यांत विधानसभा आणि विधानपरिषद आहेत. नितीश कुमारांनी आपली पहिली विधानसभेची निवडणूक 1977 साली लढवली होती. जनता दलाकडून हरनौत मतदारसंघाकडून लढवलेली ही निवडणूक ते हरले होते. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा त्याच जागेवरुन निवडणूक लढवली आणि ते 1985 साली विजयी झाले.

विधानपरिषदेची वाट निवडून मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार हे काही एकमेव मुख्यमंत्री अर्थातच नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील विधानपरिषदेतून आमदार होऊनच मुख्यमंत्रीपदी सत्तारुढ झालेले आहेत. जनता दल युनायटेड या पक्षाची धुरा सांभाळत मुख्यमंत्री पद सांभाळणे या दोन्हीही गोष्टी जबाबदारीच्या आहेत, आणि म्हणूनच राज्याचा आणि पक्षाचा प्रमुख म्हणून ते निवडणूक लढवण्यापासून दूर राहतात असं जेडीयूच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं.  निवडणूकीमध्ये त्यांना संपूर्ण राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळावी लागते. जर ते एखाद्या विशिष्ट जागेवरुन निवडणूक लढवू लागले तर त्यांना नाईलाजास्तव आपल्याच जागेवर जास्त वेळ द्यावा लागेल. आणि म्हणूनच जेडीयू पक्षाला जास्तीतजास्त फायदा व्हावा म्हणून ते निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतात. 

हेही वाचा - Bihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका

मुख्यमंत्री म्हणून बिहार राज्याची धुरा सांभाळण्याआधी नितीश कुमार यांनी 1989 पासून 2004 पर्यंत सगल सहावेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. आणि ते जनमाणसांत किती लोकप्रिय आहेत, यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे, असं त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं. या उदाहरणाप्रमाणेच, अनेक पंतप्रधान देखील वरिष्ठ सभागृहातूनच पंतप्रधानपदी गेलेले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दक्षिण दिल्लीतून लोकसभा लढवली होती, मात्र ते हरले होते. त्यानंतर ते राज्यसभेतून सभागृहात गेले होते. त्यांच्या आधीचे पंतप्रधान आयके गुजराल हे देखील राज्यसभेतूनच पंतप्रधानपदी गेले होते. आणि याआधी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या तेंव्हा त्या राज्यसभेच्याच सदस्य  होत्या. 

अनेक लोकसभा आणि विधानसभा सदस्यांचं असं म्हणणं आहे की खालच्या सभागृहातून निवडून येणं महत्वाचं आहे कारण जनता थेट तुम्हाला निवडत असते. सध्या केंद्रीय मंत्रीमंडळातील दोन मंत्री निर्मला सितारामण आणि एस. जयशंकर हेदेखील राज्यसभेचेच सदस्य आहेत. नितीश कुमार हे मुख्यमंत्री असताना सलग दोनवेळा विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election nitish kumar elected as cm from Legislative Council seat