esakal | धक्कादायक..! बिहारमध्ये कोरोनाबाधितांचे मृतदेह सापडताहेत गंगेत
sakal

बोलून बातमी शोधा

Ganga River

धक्कादायक..! बिहारमध्ये कोरोनाबाधितांचे मृतदेह सापडताहेत गंगेत

sakal_logo
By
उज्ज्वलकुमार

पाटणा - कोरोनाच्या संसर्गाचा (Coronavirus) उत्तर भारताला (North India) मोठा फटका बसला असून उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar) या दोन राज्यांमध्ये मृतांचा आकडा वाढत चालला आहे. अनेक ठिकाणांवर मृतदेहांवर (Deathbody) अंत्यसंस्कार (Funeral) न करताच ते तसेच गंगेमध्ये (Ganga River) प्रवाहित केले जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्याच्या चौसा येथे गंगा नदीतून वीस मृतदेह बाहेर काढून नंतर त्यांचे दफन करण्यात आले. स्थानिक यंत्रणेने तब्बल ४० मृतदेह ताब्यात घेतल्याचे बोलले जाते . हे सगळे मृतदेह उत्तरप्रदेशातील गाझीपूर येथून वाहत आले असावेत तसेच ते कोरोनाबाधितांचे असावेत असा अंदाजही वर्तविला जात आहे. बिहारमधील बक्सर हा जिल्हा उत्तर प्रदेशलाच लागून आहे. (Bihar Death Bodies of Corona Victims are Found in the Ganga River)

चौसाचे उपविभागीय अधिकारी के.के. उपाध्याय यांनी स्मशानभूमीची पाहणी करताना लोकांनी मृतदेह गंगेमध्ये सोडू नयेत, असे आवाहन केले आहे. येथील घाटांवर रात्री उशिरापर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात, खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आधीच स्थानिकांना मृतदेह पाण्यात सोडू नयेत अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता आणखी वाढू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Srinivas BV : कोरोना संकटात ठरतोय देवदूत, परदेशातही चर्चा

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

मागील दोन दिवसांपासून सातत्याने गंगेत मृतदेह आढळून येत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज पुन्हा काही मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यांना बाहेर काढत त्यांचे दफन केले. हे मृतदेह दीर्घकाळ पाण्यात राहिल्याने त्यांची ओळख पटविणे देखील अवघड झाले आहे. ग्रामीण भागांत मोठ्या संख्येने लोक मरण पावत असून त्यांचे मृतदेह तसेच गंगेत सोडले जात असावेत, असा संशय व्यक्त होतो आहे.

यमुनेतही पाच मृतदेह

लखनौ ः उत्तरप्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात यमुना नदीमध्ये सहा मे रोजी पाच मृतदेह आढळून आल्याची घटना उघड झाली आहे. दरम्यान हे मृतदेह कोरोनाबाधितांचे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथील यमुना नदीवरील पुलाच्या खाली अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये हे मृतदेह आढळून आले होते. स्थानिक प्रशासनाने या मृतदेहांवर पुन्हा अंत्यसंस्कार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.