Bihar Election - शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उतरणार बिहारच्या रणांगणात; पण युती नाहीच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्याशी गाठ पडणार आहे. 

पाटना - बिहारच्या निवडणुकीत आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा उतरणार आहे. एनसीपी बिहारमध्ये स्वबळावर लढणार असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्टार प्रचारक असणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, बिहारमध्ये पक्ष कोणत्याही प्रकारची आघाडी किंवा हातमिळवणी करणार नाही. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र जागावाटपावरून ते शक्य झालं नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बिहारमध्ये मात्र वेगळी चूल मांडली आहे. शिवसेनेसोबत बिहारमध्ये कोणतीच युती नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात प्रचारावेळी अखेरच्या टप्प्यात वातावरण बदलून टाकणाऱ्या आणि सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बाजावणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बिहारमध्ये प्रचार कऱणार आहेत. एनसीपीने प्रचार करणाऱ्या 40 नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. 

वाचा - राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना?

बिहारच्या निवडणुकीत प्रचार कऱणाऱ्या नेत्यांची यादी जरी प्रसिद्ध केली असली तर किती जागा लढवणार याबाबत पक्षाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितंल की, बिहार निवडणूक प्रचारासाठी 40 नेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसंच लवकर मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक विधानसभेच्या जागा आणि उमेदवारांची यादी जाहीर करतील असं सांगितलं. 

भाजपकडून महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्याशी गाठ पडणार आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार यांच्याशिवाय खासदरा प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, केके शर्मा यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election 2020 ncp will contest key star campaigner list