राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

राजकारणाचा माहोल आधीच समजून घेण्यात ते वस्ताद होते. सरकारे बदलत राहीली मात्र पासवान यांचा राजकारणाच्या हवामानाचा अंदाज चुकला नाही.

पाटना : लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं काल दु:खद निधन झालं. काल गुरुवारी दिल्लीमध्ये वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूमुळे देशातील आणि खासकरुन बिहारच्या राजकारणातील एक सर्वांत महत्वपूर्ण दलित चेहऱ्याची ही अखेर म्हणायला हवी. आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरवातीला राजनारायण आणि जयप्रकाश नारायण यांच्यासोबत काम केलेल्या पासवान यांची ओळख एक स्वतंत्र राजकारणी म्हणूनही राहीलेली आहे. राजकारणाचा माहोल आधीच समजून घेण्यात ते वस्ताद होते. त्यांची ही वस्तादी इतकी अचूक असायची की त्यांना भारतीय राजकारणाचे हवामानतज्ञ म्हटलं जायचं. 

हेही वाचा - केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे निधन

1977 मध्ये पहिल्यांदा ते खासदार बनले. 1989 मध्ये ते माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वातील जनमोर्चात होते. ते खासदार बनल्यानंतर व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कामगार व कल्याण मंत्री बनले. 1996 मध्ये ते काँग्रेसच्या पाठींब्यावर साकारलेल्या एच. डी. देवेगौडा आणि इंद्र कुमार गुजराल यांच्या सकारमध्ये ते परत एकदा मंत्री बनले. त्यानंतर ते पुढच्या लोकसभा निवडणूकांनंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये गेले आणि पुन्हा एकदा त्यांचं मंत्रीपद कायम राहीलं. सरकारे बदलत राहीली मात्र पासवान यांचा राजकारणाच्या हवामानाचा अंदाज चुकला नाही. 2004 च्या लोकसभा निवडणुकांना 2002 च्या गुजरात दंगलींची पार्श्वभूमी होती. त्यांनी दंगलीचा हवाला देत एनडीएला रामराम ठोकला आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएमध्ये सामिल झाले. 2004 मध्ये मनमोहन सरकार आलं आणि त्यातदेखील ते कॅबिनेट मंत्री बनले. 

हेही वाचा - राजकारणात नाईलाज असतो, पण मी NDA बरोबरच; तिकीट नाकारल्यानंतर गुप्तेश्वर पांडेंचं वक्तव्य
मात्र, 2009 मध्ये त्यांची चूक झाली. त्यांनी लालू  प्रसाद यादव यांच्यासोबत जायचा निर्णय घेतला आणि त्यांना आपली लोकसभा सीटदेखील गमवावी लागली. 2009 ते 2014 हा एवढाच काळ असा आहे ज्यात सलग 5 वर्षे कॅबिनेट मंत्रीपदापासून दुर राहिले. 2014 मध्ये पुन्हा एकदा ते राजकारणाची हवा समजून घेण्यात यशस्वी ठरले आणि ते मोदींसोबत गेले. त्याचा अर्थातच त्यांना फायदा झाला आणि ते एनडीए सरकारमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री बनले. एकूण कारकीर्दीचा आढावा घेतला तर त्यांनी विविध पक्षांच्या सहा पंतप्रधानांसोबत आजवर केंद्रीय मंत्री म्हणून काम केले आहे.  

हेही वाचा - अलीकडच्या काळात स्वातंत्र्याचा दुरुपयोग
आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत राजकारणाची इतकी अचूक पारख आणि बदलत्या राजकीय घडामोडींचा वेध घेऊन त्याप्रमाणे आपली दिशा अचूकपणे ठरवण्यात रामविलास पासवान नेहमीच यशस्वी ठरले असल्याचं दिसून येतं. ते आजारी होते, मात्र त्यांना कुठे ना कुठे बिहारचे मुख्यमंत्री असलेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाविरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा अंदाज होता. म्हणूनच त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने एनडीएचा भाग असूनही बिहारच्या या विधानसभा निवडणुकीत जेडीयूविरोधात आपला शड्डू ठोकला आहे. त्यांचा हा निर्णय चूकीचा आहे की बरोबर याचा निर्णय आपल्याला 10 नोव्हेंबर रोजी समोर येणाऱ्या निकालावरुन स्पष्ट होईलच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramvilas paswan veteran dalit leader dies worked with six pms known as weathervane