बिहारी जनतेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 4 पानांचे विकास-पत्र

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. 

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020) तिसऱ्या व अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narenda Modi) यांनी बिहारच्या जनतेला खुले पत्र लिहिले आहे. बिहारचा संपूर्ण निवडणूक प्रचार हा फक्त विकासाभोवतीच केंद्रित राहिला हे अभिमानास्पद आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. केंद्राने बिहारच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देतानाच, नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिनच्या एनडीए (NDA) सरकारला पुन्हा सत्तेत आणावे असे आवाहन त्यांनी बिहारी जनतेस केले आहे.

मोदींनी बिहारबाबतचे हे विकास-पत्र आपल्या ट्‌विटरवरही जारी केले आहे. बिहारच्या विकासासाठी एनडीएवरच विश्‍वास ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या प्रदेशात लोकशाहीची रुजवात झाली, ज्ञान-विज्ञान, शास्त्र-अर्थशास्त्र यांची भरभराट झाली त्या बिहारच्या भूमीला संपन्नतेचे वरदान लाभले असल्याचे मोदी म्हणाले.

मोदींनी म्हटले आहे, की बिहारचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्रानुसार एनडीए कटिबद्ध आहे. यावेळच्या प्रचारात बिहारच्या मतदारांमध्ये अभूतपूर्व उत्साह बघायला मिळाला. 

हे वाचा - अमित शहांची लंच डिप्लोमसी पश्चिम बंगालच्या लोकांना पचणार का?

एनडीएच्या डबल इंजिनाची ताकद बिहारला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवेल. यंदाच्या प्रचाराचा सारा भर विकास या मुद्यावरच राहिला हा अभिमानाचा विषय आहे. एनडीएने मागील कामेच जनता जनार्दनासमोर ठेवली असे नाही तर पुढच्या काळातील राज्यकारभाराचे व्हीजनही आम्ही मतदारांसमोर मांडले. सामाजिक-आर्थिक संपन्नतेसाठी उत्तम पायाभूत संरचना व कायद्याचे राज्य अत्यावश्‍यक असते. अव्यवस्था व अराजकतेच्या वातावरणात नवनिर्माण अशक्‍य असते. मात्र २००५ नंतर बिहारचे वातावरण बदलले व नवनिर्माणाची प्रक्रिया गतिमान झाली. ती तशीच ठेवण्यासाठी एनडीएला विजयी करावे, असेही आवाहन त्यांनी या पत्रात केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election 2020 pm modi letter to bihar people