अमित शहांची लंच डिप्लोमसी पश्चिम बंगालच्या लोकांना पचणार का?

amit shah lunch
amit shah lunch

कोलकता - ‘‘पश्‍चिम बंगालमधील २०२१ च्या निवडणुकीत भाजप दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेवर येईन व तृणमूल काँग्रेसचे सरकार उलथवून लावेल,’’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी व्यक्त केला. गृहमंत्री अमित शहा हे आजपासून दोन दिवस पश्‍चिम बंगालमधील दौऱ्यावर आहेत. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा आढावा ते घेणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी तृणमूल पक्षही तयारी करीत आहे. पूर्व पाकिस्तान आणि नंतर बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांच्या मतपेढीवर दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. विशेषतः मटुआ समाज व इतर मागास वर्गीय समाजावर भर देण्यात येणार आहे.

शहा यांनी केंद्राने गरिबांसाठी सुरू केलेल्या ८० योजना अडवल्याबद्दल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. बांकुरा येथे भेट दिल्यावर शहा यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लक्ष्य करताना ते म्हणाले की, बंगालमध्ये दररोज भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘ॲट्रॉसिटी’ला सामोरे जावे लागत आहेत. पुढील वर्षीच्या निवडणुकीत राज्यातील जनता ‘तृणमूल’च्या नेतृत्वाखालील सरकारला खाली खेचेल आणि भाजप दोन-तृतीयांश बहुमताने सत्तेवर येईल.

पश्‍चिम बंगालला गरिबी आणि बेरोजगारीचा वेढा पडला आहे. देशातील गरिबांच्या कल्याणासाठी केंद्राने तयार केलेल्या ८० योजना राज्यात राबविण्यास ममता बॅनर्जी यांचे सरकार आडकाठी करीत आहे. आम्हाला राज्य चालविण्याची संधी द्या, आम्ही बंगालला ‘सोनार बंगाल’ करू,’ असे आश्‍वासनही त्यांनी दिले. या वेळी शहा यांनी येथील स्थानिक आदिवासी कुटुंबासह भोजन घेतले.

मटुआ समाज हा पूर्व पाकिस्तानमधून आलेला असून सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व देण्याची त्यांची मागणी आहे. या समाजाने २०१९मध्ये भाजपच्या पारड्यात मते टाकली होती. पण सध्या या समाजातील युवा खासदार शंतनू ठाकूर हे हा कायदा बंगालमध्ये लागू करण्यास होत असलेल्या विलंबामुळे तक्रारीचा सूर आळवण्याच्या तयारीत असल्याने शहा यांनी या ‘लंच डिप्लोमसी’चा आधार घेतला आहे.

दरम्यान, शहा यांचे काल कोलकता विमानतळावर आगमन झाले त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मागास व अल्पसंख्याक वर्गांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करीत होत्या. निर्वासितांच्या वसाहतींना जमीन धारणेचा अधिकार देणे, जात प्रमाणपत्र सहज उपलब्ध करावे अशा मागण्यांवर ही बैठक सुरू होती. तब्बल ८० मिनिटांच्या चर्चेनंतर मटुआ, बागडी, बौरी, दुली आणि माझी या समाजासाठी विकास मंडळ स्थापन करण्याचा आदेश बॅनर्जी यांनी दिला. अर्धनागरी आणि ग्रामीण भागातील कामगार वर्गाचा पाठिंबा तृणमूल काँग्रेस पक्षाला परत मिळावा, हे या निर्णयामागील उद्दिष्ट आहे. तसेच मटुआसारख्या हिंदू निर्वासितांना भाजपकडे खेचण्याच्या शहा यांच्या खेळीला शह देण्याचा सुप्त हेतू ममता बॅनर्जी यांचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com