esakal | Bihar Election: भाजपचे पासवान 'अस्त्र' यशस्वी! जेडीयू ठरणार छोटा भाऊ
sakal

बोलून बातमी शोधा

chirag paswan

जेडीयूच्या जागा कमी झाल्याने भाजपचे पासवान अस्त्र यशस्वी ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Bihar Election: भाजपचे पासवान 'अस्त्र' यशस्वी! जेडीयू ठरणार छोटा भाऊ

sakal_logo
By
सौजन्य - द प्रिंट

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीचे कल हाती येऊल लागले आहेत. सुरुवातींच्या कलांमध्ये तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनत दल आणि काँग्रेस आघाडीवर होती, पण जसीजशी मतमोजणी पुढे जात गेली तसंतसं एनडीएने आघाडी घेतली आहे. नितीश कुमार यांची संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप 128 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. भाजप सध्याच्या कलानुसार 75 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे, तर जेडीयू 50 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे सध्यातरी जेडीयू छोटा भाऊ ठरल्याचे चित्र आहे. 

जेडीयूच्या जागा कमी झाल्याने भाजपचे पासवान अस्त्र यशस्वी ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. एनडीएतून बाहेर पडलेल्या चिराग यांनी निवडणुकीदरम्यान स्पष्टपणे भाजपचे समर्थन केले होते. शिवाय भाजपचा उमेदवार उभा असलेल्या मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मी पंतप्रधान मोदींचा हनुमान असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. 

Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त...

दुसरीकडे, चिराग यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. अनेकवेळा त्यांनी नितीश कुमारांवर अत्यंत जहरी टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. लोजपाची सत्ता आल्यास नितीस कुमारांना तुरुंगात पाठवले जाईल, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली होती. नितीश कुमारांच्या नेतृत्वात बिहार कसा अधोगतीला गेला आहे, हे चिराग ठासून सांगत होते. चिराग पासवान यांनी जेडीयू विरोधात मोहिमच सुरु केली होती.

नितीश कुमार यांचे महत्व कमी करण्यासाठी भाजपने चिराग यांचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जागा कमी होण्यामागे भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप जेडीयूच्या काही नेत्यांनी केला आहे. भाजपने चिराग पासवान यांना बाहुले करुन नितीश कुमारांना शर्तीतून बाहेर काढण्याचा खेळ केला, असा आरोप होत आहे. भाजप एकट्याच्या जिवावर बहुमताजवळ पोहोचली तर लोजपाला सोबत घेऊन सरकार स्थापन करता येईल, असा भाजप नेत्यांना अंदाज होता. पण, सध्याच्या कलांनुसार भाजप एकट्याने बहुमताजवळ जाईल, असं वाटत नाही. दरम्यान, अद्याप 25 टक्के मतमोजणी झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे निकाल वेगळाही लागू शकतो. 

(सौजन्य- द प्रिंट)