Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त होण्याची चिन्हे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

बिस्कीट या चिन्हावर आक्षेप घेत शिवसेनेने चिन्ह बदलून मागितले होतं. त्यानंतर शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह देण्यात आले होते.

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत भाजप-जेडीयूच्या एनडीएला काँग्रेस-राजद आघाडीने तगडे आव्हान दिले आहे. मतमोजणी पूर्व सर्व अंदाजांमध्ये राजद आघाडीवर होता मात्र, आताचे कल भाजप-जेडीयूच्या बाजूने झुकलेले दिसताहेत. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनीही या निवडणुकीत आपली ताकद आजमावली होती. 

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांपेक्षा तिथल्या प्रादेशिक पक्षांचा बोलबाला दिसून येतो. या बिहारच्या राजकीय आखाड्यात महाराष्ट्रातील शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले उमेदवार उभे केले होते. सुरवातीला 50 जागांवर शिवसेना निवडणूक लढवेल असं बोललं जात होतं. त्यांनतर  शिवसेना 10 ते 20 जागांवर आपले उमेदवार लढवेल असं सांगितलं गेलं. मात्र, शिवसेनेला या निवडणुकीत आपला भोपळाही फोडता आला नाहीये. काही ठिकाणी शिवसेनेचे डिपॉझीट जप्त होण्याचीही शक्यता दिसून येत आहे. 

हेही वाचा - Bihar Election : आता भाजप मोठा भाऊ; लोजपाने केसाने कापला गळा?

शिवसेना या निवडणुकीत चर्चेत आली होती ती वेगळ्याच कारणाने. या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवडणूक चिन्हावरुन चर्चेत आली होती. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे धनुष्य बाण आहे. तर बिहारमधील प्रमुख सत्ताधारी राजकीय पक्ष जेडीयूचे चिन्ह  बाण आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चाचे चिन्ह देखील धनुष्य बाण आहे. यावरुन गोंधळ होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेनेला चिन्ह बदलून दिले  होते. त्यांना बिस्कीट हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र, या चिन्हावर आक्षेप घेत शिवसेनेने चिन्ह बदलून मागितले होते. त्यानंतर शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह शिवसेनेच्या व्यक्तीमत्वाला साजेशे असे होते. मात्र, तरीही शिवसेनेला बिहारमध्ये काही मोठ्याने तुतारी वाजवता आलेली नसल्याचं स्पष्ट  होतंय. 

डिपॉझीट जप्त होण्याची शक्यता
शिवसेनेला कुठेच आघाडी घेता आली नाहीये. त्यामुळे विजयाची शक्यता लांब लांबपर्यंत दिसत नाहीये. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीट जप्त होण्याचीच जास्त शक्यता आहे. 

हेही वाचा - Bihar Election : इव्हीएम हॅक केले जाऊ शकत नाही का? काँग्रेस नेत्याचा सवाल

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना टोला लगावला आहे. 'बिहारमध्ये असलेलं 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं असून आता 'मंगलराज' सुरू झालं आहे. बिहारमध्ये आता 'तेजस्वी लाट' आली आहे. बिहारमध्ये 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं आहे. आता 'मंगलराज' सुरू झालं आहे.' असं राऊत म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election Updates shivsena is going to lose its deposits on many seats