बिहारमध्ये नितीश सरकारला धक्का; नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

तीनच दिवसात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टर मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. विषेश म्हणजे गुरुवारीच त्यांना पदभार स्वीकारला आणि राजीनामा दिला. 

पाटणा - बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेल्या एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. या मंत्रिमडळाचा शपथविधी 16 नोव्हेंबरला झाला. दरम्यान, तीनच दिवसात नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील नवनियुक्त शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टर मेवालाल चौधरी यांनी गुरुवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. विषेश म्हणजे गुरुवारीच त्यांना पदभार स्वीकारला आणि राजीनामा दिला. त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हा राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. 

भ्रष्टाचाराचे आरोप होत असलेले शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवार पदभार स्वीकारल्यानंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मेवालाल चौधरी यांच्यावर सबौर विद्यापीठाचे कुलपती असताना भरती घोटाळा केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. 

मेवालाल चौधरी 2015 मध्ये पहिल्यांदा जदयूकडून आमदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं होतं. कुलपती असताना कृषी विद्यापीठात 2012 मध्ये सहाय्यक प्राध्यपक आणि ज्यूनिअर वैज्ञानिकांची भरती झाली होती. या नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप कऱण्यात आला होता.

हे वाचा - लोन मोरेटोरियम : क्रेडिट कार्डधारकांचे व्याजावर व्याज माफ करू नये - SC

कृषी विद्यापीठातील भरती घोटाळ्याप्रकरणी सबौर पोलिस ठाण्यात 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामिन दिला होता. दरम्यान, आतापर्यंत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar election Education Minister Mewa Lal Choudhary resigns