esakal | Bihar Election - मुख्यमंत्री कोण? NDA च्या बैठकीत झाला निर्णय; राज्यपालांकडे करणार दावा
sakal

बोलून बातमी शोधा

susheel modi with nitish kumar

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते.

Bihar Election - मुख्यमंत्री कोण? NDA च्या बैठकीत झाला निर्णय; राज्यपालांकडे करणार दावा

sakal_logo
By
उज्ज्वलकुमार

पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु आजच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी रविवारी दुपारी १२.३० वाजता एनडीएची बैठक बोलावली असल्याचे जाहीर करण्यात आले. त्याचदिवशी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे.

आजच्या बैठकीत जेडीयूकडून नितीशकुमार, विजय चौधरी, विजेंद्र यादव आणि अशोक चौधरी यांनी सहभाग घेतला. तर भाजपकडून सुशीलकुमार मोदी, नित्यानंद राय, संजय जयस्वाल आणि हम पक्षाच्या वतीने जीतनराम मांझी आणि व्हीआयपीकडून मुकेश सहानी उपस्थित होते. काल सायंकाळी नितीशकुमार यांनी जनता हेच खरे मालक असून आतापर्यंत कोणत्याच मुद्द्यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे म्हटले होते. रविवारच्या बैठकीत रणनिती आखली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील आमचा संपूर्ण प्रचार एनडीए केंद्रित होता. मात्र उमेदवार नसतानाही आमच्या जागा निवडून उमेदवार उभे केले आणि आमचे नुकसान केले, असे नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांचे नाव न घेता टीका केली.

एनडीएची रविवारी बैठक होणार असून त्यात सर्व मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. यावेळी भाजपने जेडीयूपेक्षा अधिक जागा मिळवल्या असून तो मोठ्या भावाच्या रुपाने समोर आला आहे. त्यामुळे भाजपचे किती मंत्री असतील, यावर एकमत करण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हीआयपी पक्षाचे किती मंत्री असतील आणि त्यांचे सरकारमधील स्थान कितपत असेल, यावर देखील चर्चा केली जाणार आहे. एनडीए आमदारांबरोबरची चर्चा पुढील प्रमुख तीन मुद्द्यावर राहू शकते. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्री राहतील आणि सभापती देखील जेडीयूचाच होईल.

हे वाचा - Bihar Election : ही माझी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या नितीश कुमार यांचा यु-टर्न

महाआघाडीतही विचारमंथन
बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यावरून एनडीएची तयारी सुरू असताना दुसरीकडे महाआघाडीतही मंथन सुरू आहे. महाआघाडीचे लक्ष छोट्या पक्षावर आहे. विशेषत: हम, व्हिआयपी तसेच एआयएमएम. एमआयएमचे पाच उमेदवार निवडणून आले आहेत.

एनडीएकडे बहुमत
बिहार विधानसभेच्या २४३ जागांवर निवडणुका झाल्या आणि त्यात एनडीएला १२५ जागा मिळाल्या. महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. भाजपला ७४, जेडीयूला ४३, राजदला ७५, कॉंग्रेसला १९ जागा मिळाल्या. तसेच भाकपला (माले) १२ आणि अन्य पक्षाच्या वाट्याला ८ जागा आल्या आहेत.

हे वाचा - Bihar Election: बिहारच्या निवडणुकीचे संकेत

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज सायंकाळी राज्यपाल फागू चौहान यांना भेटून राजीनामा दिला. राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पदावर राहण्याची विनंती केली. येत्या १५ नोव्हेंबरला एनडीएकडून ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.

उपमुख्यमंत्री बदलाचे संकेत
सुशीलकुमार मोदी हे २००५ पासून उपमुख्यमंत्रीपदावर असून नव्या रचनेत त्यांच्या जागी दलित किंवा इबीसी समुदायास स्थान दिले जावू शकते, अशी चर्चा आहे. याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसला तरी शेजारील राज्य उत्तर प्रदेशप्रमाणे प्रयोग केला जावू शकतो. भाजपचे नेते कामेश्‍वर चौपाल यांच्या नावाची जोरात चर्चा सुरू आहे.