esakal | Bihar Election : ही माझी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या नितीश कुमार यांचा यु-टर्न
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar

नितीश कुमार यांनी म्हटलंय की माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय.

Bihar Election : ही माझी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या नितीश कुमार यांचा यु-टर्न

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 तारखेला लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याची पहायला मिळालं. नितीश कुमार यांना राजदच्या तेजस्वी यादव यांनी जेरीस आणलं, असं स्पष्टपणे दिसून आलं. बेरोजगारीच्या मुद्यावर प्रामुख्याने लढल्या गेलेल्या या निवडणुकीत अंतिमत: निसटता विजय एनडीएला  प्राप्त झाला. या निवडणुकीच्या प्रचारात ही माझी शेवटची निवडणूक असल्याने मतदान करा, असं भावनिक आवाहन नितीश कुमार यांना करावं लागलं होतं. मात्र, आता नितीश कुमार यांनी आपल्या या पवित्र्यावरुन पलटी घेतली आहे. 

हेही वाचा - दिल्ली आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'ही आपली शेवटची निवडणूक' असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत त्यांनी आता यू-टर्न घेतला आहे. त्यांनी म्हटलंय की माझ्या त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. येणाऱ्या काळात ते रिटायर होणार नाहीयेत. नितीश कुमारांनी म्हटलंय की, मी रिटायरमेंटबाबत बोललो नव्हतो. मी माझ्या प्रत्येक निवडणुकीच्या शेवटच्या सभेत नेहमी एक गोष्ट सांगत असतो की, 'अंत भला तो सब भला'. जर तुम्ही माझं भाषण काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला ते स्पष्टपणे कळेल. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधी पुर्णिया मतदारसंघातील जेडीयूच्या उमेदवाराच्या  प्रचारसभेत नितीश कुमार यांनी भाषणाच्या शेवटी म्हटलं होतं की, हा निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. यानंतर निवडणुका संपतील तसेच ही माझीही शेवटची निवडणूक आहे. अंत भला तो सब भला. 

हेही वाचा - अरुंधती रॉय यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून घेतलं मागे; वादग्रस्त असल्याचा शेरा

या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या पक्षाला फक्त 43 जागा प्राप्त झाल्या आहेत तर भाजपला 74 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये आता भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री कोण असतील या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले की, मी कोणताही दावा केला नाहीये. याबाबतचा निर्णय एनडीए घेईल. लोजपाने जेडीयूची मते खाल्ली आहेत का या प्रश्नावर नितीश कुमार म्हणाले की, लोजपाचं काय करायचं याबाबतचा निर्णय भाजप घेईल. त्यांना एनडीएत ठेवायचं की काढायचं हे तेच ठरवतील, असंही ते म्हणाले. शपथविधी दिवाळीनंतर होईल की छट पुजेनंतर होईल याबाबत निर्णय झालेला नाहीये. आम्ही सध्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करतो आहे.