esakal | Bihar Election : महाआघाडी होणार! काँग्रेस-राजदच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे
sakal

बोलून बातमी शोधा

RJD Congress

बिहार निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना अजूनही दोन्ही बाजूमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे

Bihar Election : महाआघाडी होणार! काँग्रेस-राजदच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पटना : बिहारचा प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलच्या नेतृत्वात असलेल्या महाआघाडीमधील जागावाटपांवर आता सर्व पक्षांत एकमत झल्याचं चित्र दिसून येतंय. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या महाआघाडीतील सर्वांत मोठा पक्ष राजद हा एकूण 143 जागांवर लढणार आहे कर काँग्रेस 70 जागांवर आपला उमेदवार उभा करणार आहे. राजद आपल्या वाटणीच्या जागांमधून मुकेश साहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीला काही जागा देणार आहे. साधारणत: 10 ते 12 जागांवर हा पक्ष निवडणूक लढवेल. सुत्रांच्या माहितीनुसार, या जागावाटपात डाव्या पक्षांना 28 ते 30 जागा मिळालेल्या आहेत. 

जागावाटपांवरील झालेली ही सहमती पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नामांकनानंतर दुसऱ्या दिवशी बनली आहे. मात्र, या जागावाटपाची माहिती अजून औपचारिकरित्या जाहिर केली गेली नाहीये. राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान हे 71 जागांसाठी होणार असून ते 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 10 रोजी मतमोजणी होऊन राज्यातील निवडणूकांचे चित्र स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबरपासूनच नामांकनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 8 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहील. 

हे वाचा - मोरॅटोरियम प्रकरणी केंद्राचा दिलासा, दोन कोटीपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ

बिहार निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना अजूनही दोन्ही बाजूमधील पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. जागावाटप निश्चित होऊन चित्र स्पष्ट झाल्यावर नामांकनाच्या प्रक्रियेला गती येईल. एनडीएमध्ये अजूनतरी जागावाटप झालेले नाहीये. लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांच्यामुळे एकूण जागावाटपांचे प्रकरण रखडलेले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख 12 ऑक्टोबर आहे. 

सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री नीतीश कुमार चौथ्यांदा राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी आपली कंबर कसताहेत. तर लालूप्रसाद यादव यांच्या मुलाच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांची युती सध्या कोरोना संकट, स्थलांतरित मजूरांचा प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, महापूर आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्यांवरून रान उठवत सत्तेसाठी प्रयत्नशील आहे.