Bihar Election - शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा पिछाडीवर; ट्विट करून म्हणाला,'भाजप सत्तेसाठी काहीही करेल'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. 

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. तर काँग्रेसला  (Congress) जेमतेम २० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughn Sinha) यांचा मुलगा लव सिन्हा (luv Sinha) भाजपच्या उमेदवाराकडून पिछाडीवर आहे. बांकीपूर मतदारसंघातून लढत असलेल्या लव विरोधात भाजपचे नितिन नविन आहेत.

ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. निवडणूक आय़ोगाने उत्तर देताना आरोप फेटाळून लावले आहेत. राजदच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजदचे ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केले होते. त्यावर लव सिन्हा यांनी रिप्लाय देताना भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते असं म्हटलं आहे.

भाजपला विजय मिळाला नाही तर ते काहीही करायला मागे पुढे पाहणार नाहीत. खालच्या पातळीवर उतरून ते सत्ता स्थापन करतील. ही त्यांची जुनीच पद्धत आहे असंही लव सिन्हा यांनी म्हटलं आहे. 

हे वाचा - Bihar Election : शिवसेनेच्या तुतारीचा आवाज दुमदुमलाच नाही; डिपॉझीट जप्त होण्याची चिन्हे

मतमोजणीच्या आधी लव सिन्हा यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, निव़डणुकीत भाजपचं एकच ध्येय होतं की सत्ताविरोधी दोष जेडीयुवर यावा आणि असं वातावरण तयार व्हावं की भाजपचा मुख्यमंत्री व्हावा. मात्र त्यांची ही रणनिती आता एक स्वप्नच राहील.

दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपने ७३ जागांवर आघाडी घेतली असून जदयूने ४८ जागी आघाडी मिळवली आहे. महाआघाडीने ७५ जागांवर आघाडी मिळवली आहे. यंदा कोरोनामुळे बूथची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे ईव्हीएम मशिनची संख्याही जास्त असल्यानं निकाल समोर येण्यास उशीर होण्याची शक्यता असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election shatrughna sinha son luv trailed against bjp candidate in bankipur