
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हयात असतानाच चिराग यांनी पक्षाचा कारभार करण्यास सुरुवात केली होती. निवडणूकीच्या काही दिवस आधीच पासवान यांचे निधन झाल्याने पक्षाला धक्का बसला होता.
नवी दिल्ली - बिहारच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीपासून स्वत:ला वेगळे करत बड्यांच्या लढाईत ‘गेम चेंजर’ ठरण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाची झोळी रिकामीच राहिली. स्वत:ला ‘मोदींचे हनुमान’ म्हणवून घेणाऱ्या चिराग यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचे मात्र प्रचंड नुकसान केल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान हयात असतानाच चिराग यांनी पक्षाचा कारभार करण्यास सुरुवात केली होती. निवडणूकीच्या काही दिवस आधीच पासवान यांचे निधन झाल्याने पक्षाला धक्का बसला होता. यानंतर चिराग यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदर्श मानत त्यांनी नितीश यांना मात्र ‘व्हीलन’ ठरविले आणि तसा जोरदार प्रचार केला. उमेदवार उभे करतानाही त्यांनी केवळ नितीश यांच्या संयुक्त जनता दलाविरोधातच आपले उमेदवार उभे केले. प्रचार करतानाही त्यांनी भाजपस्तुती आणि नितीशनिंदा करताना राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्यावरही टीका करण्याचे टाळले. त्यामुळे पुरेशा जागा मिळवून स्वत:चे राजकीय महत्त्व वाढविण्याची त्यांची चाल होती.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या खेळीने चिराग यांचेच प्रचंड नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीश यांच्या पक्षाच्या जागा घटल्या असल्या तरी आघाडीधर्म निभावत भाजप त्यांनाच मुख्यमंत्रिपदावर बसविण्याची चिन्हे आहेत. मात्र, ‘गेम चेंजर’ बनण्याची मनिषा बाळगलेल्या चिराग यांच्यासमोर अस्तित्वाची लढाई उभी ठाकली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, लोक जन शक्ती पक्षाने संयुक्त जनता दलाचे तीस जागांचे नुकसान केले आहे.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा