Bihar Election: महाआघाडीचं ठरलं, राजद 144 तर काँग्रेस 70 जागांवर लढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 3 October 2020

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे.

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे. शनिवारी (दि.3) राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागा वाटपाची माहिती दिली आहे. या निवडणुकीत राजद 144 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस 70 जागा आणि त्याचबरोबर वाल्मिकीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार देणार आहे. सीपीएमला 4 जागा, सीपीआयला 6, सीपीआयला (माले) 19 जागा देण्यात आल्या आहेत. 

पुतीन विरोधी पत्रकाराची पेटवून घेत आत्महत्या; फेसबुकवर केली 'सुसाइड पोस्ट

हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीला राजदच्या कोट्यातून जागा देण्यात येणार आहेत. याचदरम्यान, महाआघाडीकडून 'संकल्प बदलाव का' ही नवीन घोषणा देण्यात आली. काँग्रेस नेते अविनाश पांडे यांनी खूप विचार करुन बिहारमध्ये बदल घडवण्यासाठी एक मजबूत आघाडी करण्यात आल्याचे सांगितले. बिहारच्या विकासासाठी एका मंचावर येण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. 

पांडे पुढे म्हणाले की, बिहारच्या जनतेने 2015 मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात मत दिले होते. परंतु, नितीश कुमार यांनी जनमताचा अनादर करत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. बिहारची जनता त्यांना माफ करणार नाही. मोदी सरकार शेतकऱ्यांचा छळ करत आहे. बिहार एक युवा प्रदेश आहे. राज्यात युवकांची संख्या जास्त आहे. तेजस्वी यादव एक युवा चेहरा आहे. लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव गरीबाचे पुत्र आणि संघर्षशील नेता म्हणून ओळखले जातात. 

Bihar Election : मायावतींना तेजस्वी यादव यांचा दणका; बिहारच्या...

नितीश कुमार यांच्या तथाकथित सुशासनच्या सरकारमध्ये बिहारच्या जनतेला मागील 15 वर्षांत नैराश्य आले आहे. बिहारमध्ये बेरोजगारी पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारमध्ये रोजगार नसल्यामुळे भारतातील प्रत्येक राज्यात येथील नागरिकांना मजुरीसाठी जावे लागते, असेही पांडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला महाआघाडीतील घटक पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Mahagathbandhan Announced Seat Sharing Formula Rjd Congress Bihar Elections 2020