विकास दुबे चकमक प्रकरणातील, दोन वाँटेड आरोपी शरण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

पोलिस आरोपींच्या शोधात होते मात्र ते थेट विशेष न्यायाधीश दस्यू यांच्या न्यायालयासमोर हजर झाले. विशेष म्हणजे यातील एका आरोपीने चक्क वकीलाच्या वेषात न्यायालयात हजेरी लावली आणि शरणागती पत्करली.

कानपूर - दीड महिन्यापूर्वी झालेल्या बिकरू इथल्या हत्याकांड प्रकरणातील दोन मोस्ट वाँटेड आरोपींनी न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. तर इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बिकरू इथं विकास दुबेला पकडण्यासाठी गेल्यावर पोलिसांवर विकास दुबेसह त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता. यावेळी 8 पोलिस हुतात्मा झाले होते. या प्रकरणी दोन आरोपी न्यायलयासमोर शरण आल्यानंतर इतर दोघांना पोलिसांनी अटक केली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विष्णू पाल आणि शिवम दुबे अशी न्यायालयात हजर झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्याच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं. बुधवारी सायंकाळी त्यांनी कानपूर देहातच्या माती न्यायालयात शरणागती पत्करली होती. पोलिस आरोपींच्या शोधात होते मात्र ते थेट विशेष न्यायाधीश दस्यू यांच्या न्यायालयासमोर हजर झाले. विशेष म्हणजे यातील एका आरोपीने चक्क वकीलाच्या वेषात न्यायालयात हजेरी लावली आणि शरणागती पत्करली. दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 2 जुलैला झालेल्या घटनेनंतर दोघेही फरार होते. 

हे वाचा - डॉक्टरने युवतीच्या हत्येचा खुलासा व्हिडिओमधून केला

एकीकडे दोन आरोपी न्यायालयात हजर झालेले असताना दुसरीकडे चौबेपूर पोलिसांनी अन्य दोन आरोपींना अटक केली आहे. रमेशचंद्र आणि मनिष ऊर्फ वीरू यांना दक्षता पथक आणि चौबेपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने काल रात्री शिवली रोडवरील बेला चौकाजवळ अटक केली. अटकेनंतर दोघांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला आहे. दरम्यान, कानपूरचे पोलिस महासंचालक डॉ. प्रितिंदर सिंह म्हणले की, बिकरु येथे घडलेल्या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना पकडले तर अन्य दोन आरोपींनी न्यायालयासमोर शरणागती पत्करली आहे. 

काय घडले होते २ जुलैच्या रात्री 
मोस्ट वॉंटेड गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी बिकरु येथे पोलिसांचे पथक २ आणि ३ जुलैच्या मध्यरात्री त्याच्या घरी पोचले होते. परंतु या कारवाईची खबर विकास दुबेला अगोदरच लागली होती. त्यामुळे विकास दुबेने पोलिसांवर हल्ला केला. यावेळी त्याच्यासमवेत साथीदार होते. या भ्याड हल्ल्यात ८ पोलिस हुतात्मा झाले. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार विकास दुबेला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक केली. त्याला कानपूर येथे आणताना गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्याने घटनास्थळाहून पळ काढणारा विकास दुबे चकमकीत मारला गेला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bikaru murder case two more surrender in court