
‘लाऊडस्पीकर मुक्त' दिल्लीसाठी भाजप आक्रमक
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे (ध्वनीवर्धक) होणाऱया ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा राजधानी दिल्लीतही हाती घेतला असून या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपराज्यपाल अनिल बैजल यांना पत्रे लिहून दिल्लीतील मशिदीही ‘लाऊडस्पीकर मुक्त' कराव्यात किंवा त्या लाऊडस्पीकर्सचा आवाज कमी करावा असे साकडे घातले आहे. दिल्लीत आधीच प्रदूषण फार, त्यात मशिदींच्या आवाजामुळे आणखी ध्वनिप्रदूषण होते असा युक्तिवाद भाजप नेत्यांनी केला आहे. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था केंद्र सरकारच्या हातात असते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेत दिलेल्या याबाबतच्या शाऱयाचे पडसाद दिल्लीत उमटले असून भाजपने लाऊडस्पीकरचा मुद्दा तापविण्यास सुरूवात कली आहे भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशात शेकडो मशिदींवरील लाऊडस्पीकर हटविल्याचे उदाहरण दिले आहे. भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनीही उत्तर प्रदेशाचा कित्ता दिल्लीतही गिरवावा अशी जाहीर मागणी उपराज्यपाल बैजल यांना पत्राद्वारे केली आहे. धार्मिक स्थळांवरील (विशेषतः मशिदी) लाऊडस्पीकरचा आवाज सर्वोच्च न्यायालयाच्या याबाबतच्या आदेशांचे ललंघन करतो असे सांगून वर्मा यांनी म्हटले आहे की लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे त्या त्या परिसरातील शांतता भंग होते.
आसपासच्या भागांतील अभ्यास करणारी मुले व गंभीर आजारी रूग्णांना लाऊडस्पीकरचे आवाज अत्यंत त्रासदायक ठरतात. न्यायालयाच्या आदेशाचे पालन यूपी सरकारने योग्य पध्दतीने केले आहे. त्या राज्यात ५४ हजार धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर्स हटविले गेले व ६० हजार लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादित केला गेला. मात्र दिल्लीत तसे होत नाही. त्यामुळे दिल्लीत मशिदींवरील लाऊडस्पीकर त्वरित हटविण्याची किंवा त्यांचा आवाज कायद्याच्या मयार्देत ठेवण्याची कारवाई त्वरित करावी व याबाबत अधिकाऱयांना निर्देश द्यावेत असे प्रवेश वर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.
दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांनी मसिदींवरील लाऊडस्पीकरमुळे होणाऱया कथित ध्वनीप्दूषणाचा मुद्दा दिल्लीतील प्रदूषणाशी जोडला आहे. दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरते अशी वेळ दरवर्षी येते. दिल्लीत आधीच इतके प्रदूषण असताना लाऊडस्पीकरच्या ध्वनी प्रदूषणाची भर त्यात कशास्तव ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केला आहे. ‘लाऊडस्पीकर हा कोणत्याही धर्माचा भाग नसतो व नाही‘ या मुंबई उच्च न्यायालयाच्या टिप्पणीचाही उल्लेख त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लिहीलेल्या पत्रात गुप्ता यांनी म्हटले आहे की दिल्लीत ध्वनीप्रदू,ण सर्वाधिक पातळीवर पोचले आहे. दिल्लीकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. अनेक राज्यांत धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटविले गेले आहेत व तेथील जनतेकडूनही याचे स्वागत होत आहे. मग दिल्लीत त्याला विलंब का होत आहे.
Web Title: Bjp Aggressive Loudspeaker Free Letters Bharatiya Janata Party Chief Minister Arvind Kejriwal And Lieutenant Governor Anil Baijal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..