Vidhan Sabha 2019 : भाजपची उमेदवार यादी नवरात्रात

सकाळ न्यूज नेटवर्क 
Thursday, 26 September 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावांवर, पितृपंधरवडा संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यावर म्हणजे पुढच्या आठवड्यात, नवरात्रात दिल्लीत होणाऱ्या बैठकांत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या नावांवर, पितृपंधरवडा संपल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यावर म्हणजे पुढच्या आठवड्यात, नवरात्रात दिल्लीत होणाऱ्या बैठकांत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागांवर लढण्याची सज्जता केलेल्या भाजपने संभाव्य बंडखोरीला तोंड देण्यासाठी ‘डॅमेज कंट्रोल’ गटही बनविला आहे.

कलम ३७० रद्द करण्याच्या कायद्याचे भांडवल करून भाजपने राष्ट्रवादाचा मुद्दा पुन्हा हाती घेतला आहे. मोदींच्या चेहऱ्याशिवाय भाजपला पर्यायच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या बरोबरीने निवडणुका होणाऱ्या हरियानाच्या सुकाणू समितीबरोबर आज खलबते केली. महाराष्ट्राचीही अशीच बैठक आगामी दोन-तीन दिवसांत होणार असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. राज्यात शिवसेनेबरोबरची भाजपची युती अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. मात्र राजकारणात अखेरच्या क्षणापर्यंत काहीही निश्‍चित नसते, असे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निश्‍चित केलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पितृपक्षानंतरच भाजपने मुहूर्त काढला आहे. किमान सुरवातीच्या काळात फडणवीसच मुख्यमंत्री असतील, हेही आता पक्षनेतृत्वाने स्पष्ट केले आहे. मोदी अमेरिकेतून परतल्यावर म्हणजे शनिवारनंतर याबाबत भाजपची केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) व संसदीय मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल. 

डॅमेज कंट्रोल गट
भाजपमध्ये सध्या इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. आयारामांसाठी संधी डावलली गेलेले पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बंड करू शकतात, हे ओळखून भाजपने एक ‘डॅमेज कंट्रोल’ टीम बनविल्याची माहिती आहे. ही टीम बंडखोरी होणाऱ्या संभाव्य मतदारसंघांत साम-दाम-दंड-भेद वापरून उपाययोजना सुचवेल, सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP candidate list in Navratri