
हे ‘नकली` गांधी, यांची विचारसरणीही नकलीच!
नवी दिल्ली - देशात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप करणारे कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या स्वतःच्या पक्षात लोकशाही शिल्लक तरी आहे काय ? असा पलटवार सत्तारूढ भाजपने केला आहे. ‘जी २३‘ गटाच्या कॉंग्रेस नेत्यांनी पक्षाध्यक्ष निवडणुकीबाबत बोलताच त्यांची अवस्था कशी झाली असे सांगताना संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, हे (गांधी घराणे) महात्मा गांधींचे वंशज नाहीत. हे तर नकली गांधी आहेत, यांची विचारसरणीही नकलीच आहे, असा हल्लाबोल केला. कॉंग्रेस अध्यक्षांची निवडणूक करण्याची मागणी करणाऱया (जी-२३) नेत्यांची त्या पक्षात काय अवस्था झाली हे साऱया देशाने पाहिले असेही जोशी म्हणाले.
ज्यांनी संपूर्ण देशात आणीबाणी लावून प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी केली व अनेक संपादकांना तुरंगात पाठवले ते आज हिटलरचे उदाहरण देऊन आम्हालाच लोकशाहीचे धडे देतात हे विनोदी असल्याचे सांगून माजी कायदामंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की कॉंग्रेसमध्ये अनेक चांगले नेते आहेत पण आज या पक्षावर मालकी सोनियाजी, राहूल व प्रियांका या गांधींचीच आहे. तुम्हाला देशाची जनता वारंवार नाकारत आहे यात भाजप व पक्षनेतृत्व कसे जबाबदार आहे ? कायदा, तपास संस्था अपले काम करत असून मोदी सरकारचा त्यात काही हस्तक्षेप नाही. श्रीमती गांधी व राहूल गांधी एका आर्थिक गैरव्यवहारात सक्रियपणे लिप्त असून यांची याचिका न्यायालयानेही नाकारली व हे आज जामिनावर ‘बाहेर' आहेत. देशाच्या न्यायवय्वस्थेवरही यांना विश्वास नाही. तुम्ही काही चुकीचे केले नसेल तर तपास व चौकशी सुरू झाल्याझाल्या एवढा गहजब कशासाठी चालू आहे ? भारताची जनता जर आम्हाला (भाजप) सातत्याने कौल देत असेल तर त्याचा अर्थ आमचे निर्णय व आमची विचारसरणी यांनाही ती पाठिंबा देते असा दावा जोशी यांनी केला.
प्रसाद म्हणाले की २०१९ च्या निवडणुकीमध्ये राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर काय काय आरोप केले ? जनतेने ते नाकारले. नंतर उत्तर प्रदेश निवडणुकीत तुमची बहीण उतरली तेथे जनतेने तुम्हाला एकही जागा दिली नाही व तुमच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार मोदी सरकार येण्यापूर्वीच चव्हाट्यावर आला होता. आता तुमही आपला स्वार्थ, आपला भ्रष्टाचार यापासून वाचण्याठी स्वतःला कायद्याच्या वर समजून सरकारवर आरोप करत आहात हे गैर आहे.