"पश्‍चिम बंगालमध्ये 115 भाजप कार्यकर्त्यांची हत्या; हीच लोकशाही का?''

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 5 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार-हत्या प्रकरणाचा मुद्दा तृणमूल काँग्रेसने हाती घेताच खवळलेल्या भाजपने पश्‍चिम बंगालातील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाचा मुद्दा लावून धरला आहे.

नवी दिल्ली- ‘‘पश्‍चिम बंगालमध्ये आतापावेतो किमान ११५ भाजप कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हीच राज्य सरकारची लोकशाहीची व्याख्या आहे का?’’, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. या राज्याला देशविरोधी कारवाया करणाऱ्या घुसखोरांची धर्मशाळा बनवायचे आहे का, असे विचारतानाच भाजपने, ‘राज्य सरकारच्या या दडपशाहीला राज्यातील जनता लवकरच लोकशाही मार्गानेच उत्तर देईल,’ असेही भाकीत केले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार-हत्या प्रकरणाचा मुद्दा तृणमूल काँग्रेसने हाती घेताच खवळलेल्या भाजपने पश्‍चिम बंगालातील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाचा मुद्दा लावून धरला आहे. पक्षप्रवक्ते संबित पात्रा यांनी बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाचा तपशील आज दिला. अलीकडेच उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील मनीष शुक्‍ला या कार्यकर्त्याची दिवसाढवळ्या हत्या झाली. त्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) करावा अशीच मागणी केली. ममता बॅनर्जी बाहेरच्या राज्यांतील घटनांमध्ये प्रतिनिधीमंडळ पाठवून नाक खुपसतात. त्या स्वतःच्या राज्यात हत्या झालेल्या शुक्‍ला या भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास जातील का?, असाही सवाल त्यांनी केला.

अटल बोगद्यामुळं चीनचा जळफळाट; बोगदा उडवून देण्याची ग्लोबल टाइम्सची भाषा

पात्रा म्हणाले, ‘‘राज्यात शेकडो भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या त्याबाबत राज्य सरकारची भूमिका, चोरी वर शिरजोरी अशीच राहिलेली आहे. त्रिशूलाने महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गादेवीच्या आराधनेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगालमधील सुबुद्ध जनता या अन्याय व कुशासनाला जशास तसे उत्तर मतदानयंत्रांतून देतील. ममतादीदींना भाजप हेच सांगू इच्छितो की आम्हाला जेवढे माराल, जेवढे अत्याचार कराल तेवढेच शक्तीशाली होऊन भाजप कार्यकर्ते लोकशाही मार्गाने तुमच्याविरूद्ध आवाज उठवणे सुरूच ठेवतील.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp criticize paschim bengal cm mamta banarjee