
Rahul Gandhi : भाजपकडे भविष्यवेधी दृष्टी नाही - राहुल गांधी
न्यूयॉर्क : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे भविष्याकडे पाहण्याची क्षमता नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताची मोटार आरशात पाहून चालवत असल्याने या मोटारीला एकामागून एक अपघात होत आहेत, असा टोमणाही राहुल यांनी मारला.
राहुल गांधी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘भारतात आमच्यासमोर एक अडचण आहे. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भविष्यवेधी दृष्टी नाही. त्यांच्यात ती क्षमताच नाही.
त्यांना तुम्ही काहीही विचारा, ते भूतकाळातील घटनांचेच दाखले देतात. रेल्वे अपघात कशामुळे झाला असे त्यांना विचारल्यास, काँग्रेसने मागील ५० वर्षांत या या गोष्टी केल्या म्हणून असे झाले, असे ते उत्तर देतील.
अभ्यासक्रमातून आवर्तसारणीचा धडा का काढून टाकला असे विचारले तर, काँग्रेसने ६० वर्षांत काय काय केले हे ते सांगतील. तुम्ही काहीही विचारा, ते पूर्वीच्याच घटना सांगतात. नरेंद्र मोदीही हेच करत आहेत. आरशातून मागे पहातच ते भारताची मोटार चालवत आहेत. तरीही, आपली मोटार पुढे का जात नाही, वारंवार अपघात का होतात, हे त्यांना समजतच नाही.’’ या कार्यक्रमाबरोबरच राहुल यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा समारोप केला.
राहुल म्हणाले...
महात्मा गांधी साधे, अहिंसावादी आणि भविष्याचा विचार करणारे होते
नथुराम गोडसे हा हिंसक आणि भूतकाळाबद्दलच बोलणारा होता
भारताच्या लोकशाही संरचनेवर हल्ला होत आहे
भारतीयत्व या संकल्पनेचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी
राज्यघटना आणि लोकशाही यांच्याशिवाय आधुनिक भारत शक्य नाही
तुम्ही भाजपच्या मंत्र्यांची भाषणे ऐका, मोदींची भाषणे ऐका. ते कधीही भविष्याबद्दल बोलत नाहीत. ते केवळ भूतकाळात रमतात आणि त्या काळात घडलेल्या घटनांसाठी इतरांना दोष देतात. काँग्रेसच्या सत्ताकाळात रेल्वे अपघात झाले तेव्हा आम्ही ब्रिटिशांना दोष दिला नाही. आमच्या मंत्र्याने राजीनामा दिला होता.
- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते