महाराष्ट्रातील सत्तेचा नाद सोडा!

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

 पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज दुपारी संसदेत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेचा नाद सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती भाजपमधून मिळाली.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात आज दुपारी संसदेत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेचा नाद सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती भाजपमधून मिळाली. न्यायालयाच्या निकालानंतर सध्या राज्यातून भाजपने माघार घेतली, तरी भाजप नेते मात्र ‘आम्ही महाराष्ट्र हातून सोडून दिलेला नाही. लवकरच पाहा तिकडे काय होते ते’, असे ठामपणे सांगताना दिसले. त्यावरून आगामी काळात राज्यात भाजप आणखी मोठा खेळ करण्याची सुप्त तयारी भाजपमध्ये सुरू झाल्याचे मानले जाते. 

महाराष्ट्रात शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात खेळ करून हाती घेतलेल्या सत्तेतील एकेक पत्ते हासून निसटून जात असल्याचे पाहून व खुद्द अजित पवार यांचीच चलबिचल पाहून भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने मुंबईसह महाराष्ट्राचा नाद सोडा, अशी सूचना आज दुपारी भाजप नेतृत्वाला केली. राज्यघटना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर शहा हे त्यांच्या दालनात न जाता थेट पंतप्रधानांच्या दालनात शिरले तेव्हाच पत्रकारांना, काय होणार चर्चा याचा अंदाज आला होता. महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन कमळ’ गोव्याइतके सोपे नसल्याचे फीडबॅक खुद्द नितीन गडकरी व इतर नेत्यांनी दिल्यावर पंतप्रधानांनी या साऱ्याचा फेरविचार सुरू केल्याची माहिती मिळते. 

फडणवीस यांना अहंकार नडला
मुळात पाच वर्षे एकहाती नेतृत्व देऊनही फडणवीस यांना पुरेशा जागा निवडून का आणता आल्या नाहीत, असा शहा यांचा सवाल असल्याचे समजते. फडणवीस यांचा अहंकार, त्यांच्या भोवतीची चौकडी, फडणवीस यांची बदललेली देहबोली व भाषाशैली याबाबत खुद्द राज्यातील पक्षनेत्यांनी वारंवार फीडबॅक देऊनही मोदी-शहांनी कानाडोळा केल्याचे स्पष्ट आहे.

अखेर शहा‘निती’ फोल!
अमित शहा भाजपचे ‘चाणक्‍य’ मानले जातात. मात्र त्यांना यापूर्वीही कर्नाटकात २०१८मध्ये आणि राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अपयशाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता शहा यांची रणनिती महाराष्ट्रात साफ फोल ठरली. त्यामुळे जेथे बहुमत मिळते तेथे मी सरकार बनवतो व जेथे बहुमत नसते तेथे तर मी नक्की सरकार बनवतोच बनवतो, ही शहा यांची प्रतिमा पुन्हा एकदा भंग पावली आहे.

गडकरींचा फीडबॅक महत्त्वाचा
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभेच्या प्रचारात गडकरी यांना फडणवीस यांच्या इच्छेनुसार विदर्भाबाहेर सभा घेऊ न देणाऱ्या भाजप नेतृत्वाला काल संध्याकाळी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या बैठकीतील एकी पाहून त्यांची आठवण झाली व गडकरी यांना कृष्ण मेनन मार्गावून फोन गेला. गडकरी यांनीही त्यांच्या स्टाईलने प्रयत्न सुरू केले. मात्र ज्या पद्धतीने राज्यात सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न दिल्लीतून केला गेला त्यानंतर तीनही पक्षांची एकी आणखी भक्कम झाल्याचे गडकरी यांना जाणवले व हे प्रकरण सोपे व शक्‍य नसल्याचे त्यांनी सांगितले.  आज संसदेत कार्यक्रम सुरू असताना जेव्हा अजित पवार हेच परतीच्या मानसिकतेत असल्याचा सांगावा आला तेव्हा मात्र मोदींनी शहा यांना बोलावून घेतले व चर्चेनंतर फडणवीस यांना राजीनामा देण्याचा निरोप देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP informed that the decision was taken to quit the power of Maharashtra in a parliamentary meeting between Prime Minister