भाजपच्या आयटी सेल प्रमुखाने हाथरस पीडितेचा VIDEO केला शेअर; महिला आयोगाने दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

मालवीय यांनी संबंधित व्हिडिओ हाथरसमधील मुलीचा असल्याचा दावा केला. या पोस्टनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने यावर आक्षेप घेतला असून हे कायद्याचं उल्लंघन असून कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशात संताप व्यक्त केला जात आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणी तक्रार नोंदवण्यापासून ते पीडितेच्या मृत्यूनंतरही कुटुंबावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. यातच आता भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांच्या एका ट्वीटने वाद निर्माण झाला आहे.

अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात मालवीय यांनी संबंधित व्हिडिओ हाथरसमधील मुलीचा असल्याचा दावा केला. या पोस्टनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने यावर आक्षेप घेतला असून हे कायद्याचं उल्लंघन असून कारवाई होऊ शकते असं म्हटलं आहे. 

हे वाचा - हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार- योगी आदित्यनाथ

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी सांगितलं की, जर ती बलात्कार पीडिता असेल तर तिचा व्हिडिओ शेअर करणं दुर्दैवी आहे तसंच ते कायद्याच्या विरोधातही असल्याचं म्हटंल आहे. शारीरिक शोषण झालेल्या पीडितेचं प्रकरण संशयित असलं तरी पीडितेची ओळख सार्वजनिक करता येत नाही. असं केल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

उत्तर प्रदेश महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. अध्यक्षा विमिला बाथम यांनी म्हटलं की, त्यांनी अद्याप व्हीडिओ पाहिलेला नाही. मात्र जर त्यात महिलेची ओळख उघड होत असेल तर मालवीय यांना नोटीस पाठवली जाईल. 

हे वाचा - रामविलास पासवान यांची प्रकृती खालावली, रात्री उशिरा झाली हार्ट सर्जरी

मालवीय यांनी शुक्रवारी एक 48 सेकंदाचा व्हीडिओ शेअर केला होता. रुग्णालयाबाहेर हाथरस महिलेचा रिपोर्टसोबत बोलत असलेला व्हिडिओ. ती सांगत आहे की तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाला. यातून मालवीय यांनी मुलीवर बलात्कार झाला नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. मालवीय यांनी संबंधित व्हिडिओची पोस्ट डिलिट केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp it cell share hathras victim video tweet deleted nwc concern