हरियाणातील निवडणुकीत भाजपचा लज्जास्पद पराभव; जेजेपीलाही फटका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

शेतकरी कायद्यांवरुन हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी भाजपवर नाराज आहेत.

चंदीगढ : हरियाणामध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पार्टीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 27 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानामध्ये केवळ एका जागेवर भाजपाला विजय मिळवता आला आहे. तर एक महानगरपालिका काँग्रेसच्या हातात तर दुसरी हरियाणा जनचेतना पार्टीच्या खात्यात गेली आहे. भाजपासोबत निवडणुका लढणाऱ्या जेजेपी पक्षाला तर कोणत्याच महानगरपालिकेत विजय प्राप्त करता आलेला नाहीये.
हरियाणा-पंजाबचे शेतकरी भाजपवर नाराज
शेतकरी कायद्यांवरुन हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी भाजपवर नाराज आहेत. मोठ्या संख्येनेया दोन राज्यांमधील शेतकरी दिल्ली बॉर्डरवर धरणे आंदोलन करत आहेत. काही शेतकरी संघटना या हरियाणा तसेच पंजाब राज्यात देखील अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना विचारात न घेता सप्टेंबर महिन्यात केंद्राने पारित केलेले तीनही कृषी कायदे सरकारने मागे घ्यावेत, असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. 

हेही वाचा - उसाव्यतिरिक्त आता गहू, तांदूळ यासारख्या धान्यापासूनही होणार इथेनॉलचे उत्पादन

जननायक जनता पक्षाचे प्रयत्न करुनही नुकसान
जननायक जनता पार्टीचे प्रमुख आणि हरियाणा सरकारमध्ये सहकारी म्हणून असणाऱ्या दुष्यंत चौटाला यांना शेतकऱ्यांची नाराजी स्वत:वर ओढवून घ्यायची नव्हती. यासाठी त्यांनी दिल्लीचा दौरा करुन भाजपाच्या अनेक प्रमुख नेत्यांची भेटदेखील घेतली होती. मात्र, दिल्लीच्या आश्वासनासमोर त्यांचं काहीच चाललं नाही, हे आलेल्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे. 

सातपैकी केवळ दोन जागेवर भाजपा-जेजेपीचा विजय
27 डिसेंबरला हरियाणातील तीन महानगरपालिका, तीन नगरपालिका आणि एका नगरपरिषदेसाठी निवडणुका झालेल्या होत्या. यामध्ये भाजपा आणि जेजेपी युतीला केवळ दोन जागी विजय मिळवता आला आहे. यामध्ये पंचकूला नगर आणि रेवाडी नगर परिषदमधला हा विजय आहे. बाकी पाचही जागी सत्ताधारी युतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP JJP suffer setback in haryana civic polls