काँग्रेस उरेल ट्‌विटपुरताच ! - जावडेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 22 July 2020

भविष्यकाळात कॉंग्रेस हा फक्त ट्विट करण्यापुरताच उरलेला पक्ष राहील,’ अशी टीका करून सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच स्टाईलमध्ये प्रतिहल्ला चढविला आहे. 

नवी दिल्ली - ‘भविष्यकाळात कॉंग्रेस हा फक्त ट्विट करण्यापुरताच उरलेला पक्ष राहील,’ अशी टीका करून सत्तारूढ भाजपने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच स्टाईलमध्ये प्रतिहल्ला चढविला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शाहीन बागेपासून राजस्थानातील सत्तासंघर्षापर्यंत काँग्रेस नेतृत्वाच्या सहा ‘यशांचा’ उपरोधिक उल्लेख केला आहे. जनतेने नाकारलेला हा पक्ष असल्याचे राज्यांमागून राज्ये सांगत आहेत, असेही त्यांनी म्हटले. 

देशात वाढत जाणारे कोरोनाचे संकट व राजस्थानातील सत्तेच्या खेळात राहुल गांधी व भाजप यांच्यातील ट्‌विटर वॉर जारी आहे. त्यातही, राहुल गांधींच्या रोजच्या ट्‌विटला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून वेगवेगळ्या केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरवावे लागत आहे व भाजपला एकामागे दोन ते तेरा इतकी प्रत्युत्तर ट्‌विट करावी लागतात, हे जाणकारांच्या दृष्टीने लक्षणीय आहे. राहुल यांचे ट्‌विट येताच जावडेकर यांनी प्रती ट्‌विट करून राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सहा अपयशांचा पाढा वाचला. हताशा आणि निराशेत बुडालेला हा पक्ष केंद्र सरकारवर सातत्याने घाव घालण्याचा प्रयत्न करत असला तरी ते यशस्वी होणार नाहीत असेही जावडेकर यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘कोरोनाविरूद्धची लढाई कायम, रूग्णसंख्येत सतत घट व सक्रिय रूग्ण- मृत्यूदरांबाबत अमेरिकेपेक्षा भारताची चांगली स्थित, या भारताच्या यशाकडेही राहुल यांनी लक्ष द्यावे. तुम्ही मात्र मेणबत्त्या पेटविण्यावरून देशाची जनता व कोरोना योद्ध्यांची चेष्टामस्करी करण्यात धन्यता मानलीत,’ अशी टीका त्यांनी केली. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीचे परिणाम उत्साहवर्धक

भाजपच्या मते राहुल यांचे अपयश 
फेब्रुवारी : शाहीन बाग व दिल्ली दंगली 
मार्च : ज्योतिरादित्य शिंदेंसह मध्य प्रदेशाची सत्ता गमावणे 
एप्रिल : गावांकडे निघालेल्या प्रवासी श्रमिकांना चिथावणी देणे 
मे : काँग्रेसच्या लोकसभेतील ऐतिहासिक पराभवाचा सहावा वर्धापनदिन 
जून : चीनची पाठराखण 
जुलै: राजस्थानात काँग्रेसचे पतन निश्‍चित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader and Union Minister Prakash Javadekar criticized Rahul Gandhi