सत्तेत आलो तर घुमटांसह निजामांची सांस्कृतिक चिन्हं उद्ध्वस्त करू; भाजप नेत्याचा इशारा I Nizam Symbols | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Leader Bandi Sanjay Kumar

मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला असलेल्या प्रगती भवनचंही प्रजा दरबारात रूपांतर केलं जाईल, अशी घोषणाही भाजप नेत्यानं केली.

Nizam Symbols : सत्तेत आलो तर घुमटांसह निजामांची सांस्कृतिक चिन्हं उद्ध्वस्त करू; भाजप नेत्याचा इशारा

तेलंगणात भाजपची (Telangana BJP) सत्ता आल्यास आम्ही निजामांच्या (Nizam) संस्कृतीचं प्रतिबिंब असलेल्या राज्य सचिवालयाचं घुमट पाडू, अशी घोषणा भाजप नेत्यानं केलीये.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) म्हणाले, आम्ही सत्तेवर आलो तर नव्यानं बांधलेल्या सचिवालयाच्या घुमटांसह तेलंगणातील निजामांची सांस्कृतिक चिन्हं नष्ट करू. आम्ही भारतीय आणि तेलंगण संस्कृती दर्शविणारे योग्य बदल करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

"जनम गोसा-भाजप भरोसा" या कार्यक्रमांतर्गत कुकटपल्ली विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीतील बोईनपल्ली इथं पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. यादरम्यान मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, 'सीएम केसीआर यांनी केवळ ओवैसींना खूश करण्यासाठी लोक सचिवालयाचं ताजमहालसारख्या समाधीत रूपांतर केलंय.'

मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला असलेल्या प्रगती भवनचंही प्रजा दरबारात रूपांतर केलं जाईल, अशी घोषणाही भाजप नेत्यानं केली. रस्त्यांच्या विस्तारीकरणात अडथळे निर्माण करणारी प्रार्थनास्थळं सरकार पाडेल या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी केसीआर यांना आव्हान दिलंय की, त्यांनी शक्य असल्यास हैदराबाद शहरातील जुन्या रस्त्यांवर पूल बांधावा. कुकटपल्लीतील गरीब लोकांच्या जमिनींवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

टॅग्स :BjpTelanganaKCR