अनुराग कश्यपची पत्रं भाजपनं केली लिक; आपटलेल्या सिनेमांसाठी मागितलं होतं अनुदान

टीम ई-सकाळ
रविवार, 12 जानेवारी 2020

गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर भाजपला लक्ष्य करतोय. मुळात अनुरागचे ट्विट कायम वादात असतात.

लखनऊ : सोशल मीडियावरून भाजपला सातत्यानं लक्ष्य केलेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यपवर आज, भाजपनं पलटवार केलाय. डब्यात गेलेल्या सिनेमांना सरकारी अनुदान मिळालं नाही म्हणून, अनुराग भाजपवर टीका करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. अनुदानासाठीची विनंती पत्रंही भाजप नेत्यानं ट्विटरवर शेअर केली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले त्रिपाठी?
गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप सोशल मीडियावर भाजपला लक्ष्य करतोय. मुळात अनुरागचे ट्विट कायम वादात असतात. पण, त्यानं भाजपवर सुरू केलेली टीका पक्षातील नेत्यांच्या खूपच जिव्हारी लागली आहे. त्यामुळं अनुरागला लक्ष्य करण्याची संधी भाजप नेते सोडताना दिसत नाहीत. भाजपचे शलभ मनी त्रिपाठी यांनी ट्विट करून अनुरागला लक्ष्य केलंय. त्यात अनुरागनं त्याच्या दोन सिनेमांसाठी उत्तर प्रदेश सरकारकडं अनुदानाची मागणी केली होती. कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळं त्यांना अनुदान नाकारण्यात आलं. म्हणूनच, त्यांच्याकडून भाजप सरकारवर टीका होत असल्याचं त्रिपाठी यांनी म्हटलंय. 

आणखी वाचा - पोलिसांना रॉ एजंट असल्याचे सांगितले आणि...

योगी आदित्यनाथ यांचा निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारने अनुराग कश्यप यांच्या मसान सिनेमाला 2 कोटी रुपयांचे अनुदान दिल होते. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला आणि योगी आदित्यनाथ यांनी काही निर्णय घेतले. त्यात नसुरुद्दीन शहा, अनुराग कश्यप यांच्यासह नवाझउद्दीन सिद्दिकी आणि क्रिकेटर सुरेश रैना तसेच आर.पी.सिंह यांची पेन्शन बंद केली होती. त्याचा राग अनुराग कश्यप यांच्या मनात असल्याचं त्रिपाठी यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या पेन्शन बंद करून ते पैसे गोरगरीब आणि शेतकऱ्यांना वाटले यामुळेच कश्यप यांचा तिळपापड होत आहे, असं त्रिपाठी यांनी म्हटलंय. 

नरेंद्र मोदी, अमित शह आणि योगी आदित्यनाथ यांच्याविषयी असलेल्या द्वेषाचे कारण समजून घ्या. डब्यात गेलेल्या सिनेमांवरही जनतेच्या पैशांतून अनुदान घेऊन चैन करणाऱ्यांची बक्षिसी योगी आदित्यनाथ यांनी बंद केली होती. त्यामुळं अशा फुकट्यांमध्ये द्वेष वाढणारच.
- शलभ मनी त्रिपाठी, भाजप नेते, उत्तर प्रदेश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader leaks anurag kashyap letters demanding subsidy for films