UK PM : ऋषी सुनक PM होताच मेहबूबा मुफ्तींचं ट्विट; भाजप चांगलंच भडकलं, म्हणालं.. 'तुम्ही अल्पसंख्याक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shankar Prasad vs Mehbooba Mufti

'दुर्दैवानं काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे खेदजनक आहे.'

UK PM : ऋषी सुनक PM होताच मेहबूबा मुफ्तींचं ट्विट; भाजप चांगलंच भडकलं, म्हणालं.. 'तुम्ही अल्पसंख्याक'

Rishi Sunak British PM : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होत आहेत. याबाबत मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी ट्विट करुन त्यांचं कौतुक केलंय. अल्पसंख्याक असलेल्या ऋषी सुनक यांना यूकेमध्ये (UK PM) पंतप्रधान बनवलं जात आहे, तर भारतात आम्ही अजूनही एनआरसी आणि सीएए सारख्या विभाजनकारी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांनी बांधील आहोत, असं म्हटलंय.

या ट्विटनंतर भाजप खासदार रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी पलटवार केलाय. मेहबूबा मुफ्ती ह्या जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) अल्पसंख्याक मुख्यमंत्री स्वीकारतील का? असा सवाल केलाय. मेहबूबा मुफ्तींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, यूकेमध्ये भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील, हा अभिमानाचा क्षण आहे. यूकेनं अल्पसंख्याक सदस्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारलं आहे, तरीही आम्ही NRC आणि CAA सारख्या विभाजनकारी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांनी बांधील आहोत, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: Rishi Sunak : 'जावई होणार यूकेचे पंतप्रधान'; इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींनी दिली खास प्रतिक्रिया

रविशंकर प्रसाद यांचा पलटवार

माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत मेहबुबा मुफ्तींवर जोरदार निशाणा साधलाय. मेहबुबा मुफ्ती, तुम्ही जम्मू-काश्मीरमधील कोणत्याही अल्पसंख्याकांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी स्वीकाराल का? असा सवाल केलाय. पुढील ट्विटमध्ये रविशंकर प्रसाद यांनी लिहिलंय की, ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर काही नेते बहुसंख्यवादाच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. मी त्यांना एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 10 वर्षांच्या असाधारण कारकिर्दीची आठवण करून देऊ इच्छितो. आता आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू आमच्या राष्ट्रपती आहेत, असं सडेतोड प्रत्युत्तर रविशंकर यांनी मुफ्तींना दिलं. रविशंकर प्रसाद यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलंय, 'भारतीय वंशाचे सक्षम नेते ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होत आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल आपण सर्वांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. दुर्दैवानं काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत हे खेदजनक आहे.'