भाजपला मोठा धक्का, PM मोदींच्या मतदारसंघातील विधान परिषदेच्या दोन्ही जागा गमावल्या

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

या दोन्ही ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या एक दशकापासून या दोन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. 

वाराणसी- देशात महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेले वाराणसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मतदारसंघात मोठमोठ्या विकासकामांचा शुभारंभ केलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपची पकड असल्याचे बोलले जाते. परंतु, महाराष्ट्रासह वाराणसी येथेही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. धक्कादायक म्हणजे दोन्ही मतदारसंघ भाजपला गमवावे लागले आहेत. या दोन्ही ठिकाणी समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या एक दशकापासून या दोन्ही मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. 

निवडणूक निर्णय अधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा हे 25351 मते आणि भाजपचे केदारनाथ सिंह यांना 22685 मते मिळाली आहेत. तत्पूर्वी शुक्रवारी शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार लालबिहारी यादव यांनी अपक्ष उमेदवार प्रमोद मिश्रा यांचा 936 मतांनी पराभव केला आहे. भाजपचा पाठिंबा असलेले उमेदवार आणि विद्यमान आमदार चेतननारायण सिंह हे तिसऱ्या स्थानी फेकले गेले. 

हेही वाचा- 'काँग्रेसशी आघाडी करुन सर्वकाही गमावलं', कुमारस्वामींना सलतंय दुःख

ही निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. 100 सदस्य असलेल्या उत्तर प्रदेश विधान परिषदेत भाजपचे केवळ 19 आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाकडे 52 आमदार आहेत. 

हेही वाचा- महाराष्ट्र सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

दरम्यान, महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारासमोर भाजपचा निभाव लागू शकला नाही. भाजपचा दणदणीत पराभव झाला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूरमधील पराभव हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जाते. ही निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp lost two seats of mlc in varanasi samajwadi party wins