राज्यसभेत भाजप बहुमताच्या जवळ

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

हिवाळी अधिवेशन १८ पासून
संसदेच्या हिवाळी अधिवेशनास १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरवात होणार आहे. किमान महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात भाजपने धर्मांतरविरोधी कायदा दुरुस्ती विधेयक सज्ज ठेवले असल्याची चर्चा आहे. याशिवाय अनेक प्रलंबित विधेयकेही या अधिवेशनातच मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या पाच वर्षांच्या संपूर्ण कार्यकाळात संसदीय कामकाजात मोठा अडथळा ठरलेल्या राज्यसभेतील सत्तारूढ भाजप आघाडीचा दुष्काळ संपण्याच्या मार्गावर असून, वरिष्ठ सदनात भाजपला साध्या बहुमतासाठी आता जेमतेम पाच खासदारांची गरज आहे. आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्यसभेतील बहुमताचे दुष्काळ निवारण करण्याचा चंग भाजप नेतृत्वाने बांधला आहे.

हिवाळी अधिवेशन येत्या १८ नोव्हेंबरच्या आसपास सुरू होईल तेव्हा महिनाभराच्या या अधिवेशनातच भाजपने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी केली आहे. कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार के. सी. राममूर्ती यांच्यापाठोपाठ आणखी दोन ते तीन कन्नड खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात असून, यातील दोघे काँग्रेसचे दिग्गज नेते असल्याचे सांगितले जाते. एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचे डी. कृपेंद्र रेड्डी यांच्यावरही भाजपने जाळे फेकले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात उठबस असलेल्या एका खासदारांशीही भाजपने संपर्क साधल्याची जोरदार चर्चा आहे. सप, काँग्रेस व तेलुगू देसमचे अनेक खासदार यापूर्वीच भाजपकडे गेले आहेत. राममूर्तींच्या राजीनाम्यानंतर व भाजपच्या वेटिंग लिस्टवरील आणखी सदस्यांना धरून भाजप आघाडीला आता फक्त चार ते पाच खासदार हवे आहेत. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी १२६ हा जादुई आकडा आहे.

अण्णा द्रमुकचे ११, तेलुगू देसमचे सहा आणि वायएसआर काँग्रेसचे दोन खासदारही भाजपकडे आहेत. प्रसंगी नवीन पटनाईकांचा बीजू जनता दलही मोदींना पाठिंबा देतो, हे कलम ३७० रद्द करण्यासारख्या विधेयकावेळी नुकतेच दिसले आहे.

२४५ राज्यसभेचे सदस्य
८३ भाजपचे संख्याबळ
११९ ‘एनडीए’ धरून संख्याबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP majority Rajyasabha Politics