‘लोकसभा २०२४’साठी भाजपच्या बैठका सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP meeting for Lok Sabha 2024 election

‘लोकसभा २०२४’साठी भाजपच्या बैठका सुरू

नवी दिल्ली : भाजपने गुजरात व आगामी विधानसभांबरोबरच लोकसभा २०२४ ची मोहीम सुरू केली आहे. भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यालयात होणाऱ्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचा आराखडा ठरविण्यात येणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी आपापल्या शाखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ सादर करतील.

गुजरातसह आगामी विधानसभा आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात एखाद्या विशिष्ट नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशव्यापी दौरा आखण्याचे भाजपचे नियोजन आहे.

भारत जोडो यात्रेची खिल्ली उडविण्याचे काम पक्ष प्रवक्ते करत असतानाच पक्षनेतृत्वाने मात्र राहुल यांना मिळणाऱ्या प्रतिसादावर बारीक लक्ष ठेवले आहे.

भाजपचा ‘मीडिया सेल’ व अन्य विशिष्ट नेते बारीक लक्ष ठेवून आहेत. जेथे यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्या राज्यांतील नेत्यांशी दिल्लीतून तातडीने संपर्क साधला जात असून चर्चा केली जात आहे.