लोकसभेच्या सभापतिपदी ओम बिर्ला; मोदींकडून अभिनंदन

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

राजस्थानकडे दुसऱ्यांदा मान 
ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर राजस्थानकडे दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्षपद येईल. याआधी मूळचे पंजाबचे; परंतु राजस्थानातील सिकर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले कॉंग्रेस नेते बलराम जाखड हे 1980 ते 1990 अशी दहा वर्षे लोकसभाध्यक्ष होते.

नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी इच्छुकता न दाखविल्याने ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

लोकसभेच्या सभापतिपदासाठी आज निवडणूक झाली. वेळापत्रकानुसार मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी ओम बिर्ला यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. तर शिवसेना, बिजू जनता दल, संयुक्त जनता दल, अकाली दल, लोक जनशक्ती पक्ष, वायएसआर कॉंग्रेस, एआयएडीएम, अपना दल, एनपीपी, एमएनएफ, एनडीएतील घटकपक्षांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली.

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊन ओम बिर्ला यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता. कॉंग्रेसतर्फे या प्रस्तावाला होकार देण्यात आला नसला, तरी विरोधही केला नसल्याचे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. 

अध्यक्ष निवडीनंतर उपाध्यक्षपद कोणाला मिळणार, याबाबतही अटकळबाजी सुरू झाली आहे. संसदीय संकेतांनुसार हे पद विरोधी पक्षाकडे जाते. मात्र, सरकारकडून प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसला असा कोणताही प्रस्ताव दिला गेला नाही. शिवसेनेने आधीच उघडपणे या पदाची मागणी केली आहे. मात्र, मित्रवत विरोधी पक्ष असलेल्या बिजू जनता दल किंवा वायएसआर कॉंग्रेसकडे हे पद जाऊ शकते, असेही बोलले जाते. 

राजस्थानकडे दुसऱ्यांदा मान 
ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर राजस्थानकडे दुसऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्षपद येईल. याआधी मूळचे पंजाबचे; परंतु राजस्थानातील सिकर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले कॉंग्रेस नेते बलराम जाखड हे 1980 ते 1990 अशी दहा वर्षे लोकसभाध्यक्ष होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Om Birla elected as the speaker of Lok Sabha