पश्चिम बंगाल हिंदू राज्य तर भारत हिंदू राष्ट्र होणार- साध्वी प्रज्ञासिंह

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 13 December 2020

शेतकरी आंदोलनात देशविरोधी लोक सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते शेतकरी नाहीत तर त्यांच्या वेशात डावे आणि काँग्रेसी लपले आहेत.

नवी दिल्ली- भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्यावरुन त्यांनी ममता बॅनर्जी या वेड्या झाल्याची टीका त्यांनी केली आहे. 'त्या संभ्रमित झाल्या आहेत. त्यांना हे भारत आहे की, पाकिस्तान समजत नाहीये. भारताचे रक्षण करण्यासाठी भारताचे लोक, हिंदू तयार झाले आहेत. बंगालमध्ये भाजप आणि हिंदूंचे सरकार येईल. बंगाल अखंड भारताचा हिस्सा आहे. बंगालला वेगळे करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. आमचे देशभक्त हे कदापि होऊ देणार नाहीत. बंगाल हिंदू राज्य बनेल आणि भारत हिंदू राष्ट्र असेल,' असे वक्तव्य त्यांनी केले.

लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरुन त्या म्हणाल्या की, क्षत्रियांनी त्यांचे कर्तव्य समजले पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा त्यांच्यासाठी हवा जे देशविरोधी कृत्यात सहभागी आहेत. ज्यांना देशद्रोह करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यासाठी कायदा व्हायला हवा. जे राष्ट्रधर्मासाठी जगतात. त्यांच्यासाठी हा कायदा असू नये, त्यांच्यावर बंधने नसावीत. 

हेही वाचा- संसदेवरील हल्ल्याला 19 वर्षे पूर्ण; PM मोदींनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, जे लोक देशाला अपमानित करतात. भगव्याला दहशतवाद ठरवतात. ते क्षत्रिय नसतात. भगव्याचा अपमान करत असाल तर तो हिंदुत्त्वाचा अपमान आहे. असे वक्तव्य करणाऱ्याला राजा म्हटले नाही पाहिजे.

हेही वाचा- GPS शिवाय शत्रूला संपवू शकते HAMMER; राफेलसोबत असणार खास मिसाईल

शेतकरी आंदोलनावर टीका
शेतकरी आंदोलनात देशविरोधी लोक सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. ते शेतकरी नाहीत तर त्यांच्या वेशात डावे आणि काँग्रेसी लपले आहेत. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. क्षत्रियला क्षत्रिय म्हटलं तर वाईट वाटत नाही. ब्राह्मणला ब्राह्मण म्हटलं तर वाईट वाटत नाही. वैश्यला वैश्य म्हटलं तर त्यांना वाईट वाटत नाही. शूद्रला शूद्र म्हटलं तर वाईट वाटतं. काय कारण आहे यामागे. कारण त्यांच्यात समजूतदारपणाचा अभाव आहे, असे त्यांनी म्हटले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mp sadhvi pragya singh thakur controversial statement on west bengal mamta banerjee and hindu rashtra