esakal | पत्नीचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप खासदार म्हणाले, मला न सांगताच घेतला निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

sujata khan

ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी भाजप प्रवेश केला होता. तसंच सोबत 10 आमदार आणि एक खासदार सुद्धा त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. 

पत्नीचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप खासदार म्हणाले, मला न सांगताच घेतला निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं वातावरण तापत चाललं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं ममतांना मोठा फटका बसल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, आता भाजपलाही ममतांनी दणका दिला आहे. भाजप खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल खान यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

सौमित्र खान हे पश्चिम बंगालच्या बिशुनपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार आहेत. पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल विचारले असता सौमित्र यांनी आपल्याला माहिती नसल्याचं सांगत म्हटलं की,'माझ्याझी न बोलताच पत्नीने हा निर्णय घेतला आहे.' दुसरीकडे सुजाता यांनी म्हटलं की, घरातील गोष्टी घरातच राहिल्या पाहिजेत. सुजाता यांच्या पक्ष प्रवेशावेळी खासदार सौगत रॉय आणि प्रवक्ते कुणाल घोष त्यांच्यासोबत होते. 

कोलकाता इथं तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारताना सुजाता यांनी म्हटलं की,'मला भाजपमध्ये कधीच सन्मान मिळाला नाही. लोकप्रियतेबद्दल सांगायचं तर ममता बॅनर्जी यांचा कोणी हात धरु शकत नाही.' पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि सौमित्र खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद असल्याची चर्चा आहे.

हे वाचा - 'बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडा गाठणेही कठीण; माझं टि्वट सेव्ह करा, नाहीतर...'

निवडणूक रणनीतीकार आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सहकारी प्रशांत किशोर यांनी ट्विट करून म्हटलं होतं की, माध्यमांनी भाजपचा गरजेपेक्षा जास्त प्रचार आणि प्रसार केला आहे. मात्र वास्तव हे आहे की, पश्चिम बंगालमध्ये भाजप दुहेरी आकडाही गाठण्यासाठी संघर्ष करावा लागेल. 

भाजपने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी भाजप प्रवेश केला होता. तसंच सोबत 10 आमदार आणि एक खासदार सुद्धा त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. यापैकी 8 जण तृणमूल काँग्रेसचे आहेत.