राज्यसभेत भाजपची 'पॉवर' वाढणार; सहा खासदार करणार प्रवेश?

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 20 जुलै 2019

- गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची शक्यता. 

नवी दिल्ली : गेली पाच वर्षे म्हणजे मोदी सरकार-1 च्या काळात सरकारला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (2020) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही थांबवण्याची तयारी नसल्याचे बोलले जाते. पुढच्या महिनाभरात होऊ घातलेल्या उपनिवडणुकांतच भाजपला राज्यसभेत बहुमतात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे. 

वरिष्ठ सभागृहात साध्या बहुमतापासून केवळ पाच सदस्य संख्येइतक्‍या दूर असलेल्या भाजपच्या संपर्कात विरोधी पक्षांचे तब्बल सहा खासदार असून, अन्य पाच जागा रिकाम्या आहेत. या पाचपैकी तीन जागा भाजप आघाडीला मिळणे निश्‍चित आहे व विरोधकांपैकी जेवढे भाजपवासी होतील तेवढे, असे मिळून लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत आणून तीन तलाक, दहशतवादविरोधी कायदा, काश्‍मीरबाबतचा संभाव्य कायदा आदी कळीची विधेयके येथे धडाधड मंजूर करण्याचा पक्षनेतृत्वाचा स्पष्ट इरादा दिसत आहे.

सपाचे नीरज शेखर नुकतेच भाजपमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ या पक्षाचे किमान चार खासदार भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. खुद्द सपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने संसद परिसरात अनौपचारीकरीत्या बोलताना याबद्दलची कबुली दिली. जे सहा खासदार भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते त्यांना पुन्हा सहा वर्षांच्या खासदारकीची हमी मिळएल व भाजपचेही बहमत झाल्याने विधेयकांच्या मंजुरीसाठी विरोधकांची मनधरणी करण्याचे टळेल. 

उपनिवडणुकीत रामविलास पासवान, स्मृती इराणी व एस जयशंकर हे तीनही खासदार भापने निवडून आणले. तेलगू देसमचे चार खासदार नुकतेच सत्तारूढ बाजूला आले आहेत. यामुळे राज्यसभेत कॉंग्रेसपेक्षा आताच मोठा पक्ष असलेली भाजप आघाडी येथील बहुमताच्या जादुई आकड्यापासून (123) केवळ पाच खासदारांपुरती दूर आहे. राज्यसभेत आजच पाच जागा रिक्त आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन, शरद यादव यांची अपात्रता, नीरज शेखर यांचा राजीनामा तसेच तमिळनाडू व ओरिसातील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. यातील पहिल्या तीन जागा भाजप निवडून आणू शकतो.

उर्वरीत दोन्ही राज्यांत अण्णाद्रमुक व ओडिशाचे नवीन पटनाईक यांचा कल सरळसरळ भाजपकडेच आहे. साहजिकच भाजपला पाच जागांचा लाभ होऊ शकतो. शिवाय सत्तारूढ पक्षात सपाचे चार खासदार आले तर हे बहुमत आणखी मजबूत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Seats will increases in Rajya Sabha