... तर तिथल्या तिथे राजीनामा दिला असता;  सभागृहातील वादाबाबत उदयनराजे यांचे स्पष्टीकरण 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 24 July 2020

राज्यसभेत काल उदयनराजे यांनी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाच्या नियमांची आठवण करून देत तिथल्या तिथे इशारा दिला होता.

नवी दिल्ली - ‘‘राज्यसभेतील शपथविधीवेळी आपण घोषणा दिल्यानंतर सभापती वेंकय्या नायडू यांनी राज्यघटनेची आठवण करून दिली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा कोठेही अपमान झालेला नाही. तसा झाला असता तर आपण तिथल्या तिथे राजीनामा दिला असता,’’ असा खुलासा भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केला. दुसरीकडे खुद्द सभापती नायडू यांनी ट्विट करून आपण स्वतः छत्रपती शिवाजींचे प्रशंसक व भवानी मातेचे उपासक आहोत कोणाबद्दलही अनादर दाखविलेला नाही, असे स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यसभेत काल उदयनराजे यांनी शपथ घेतल्यावर घोषणा दिल्या. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर नायडू यांनी वरिष्ठ सभागृहाच्या नियमांची आठवण करून देत तिथल्या तिथे इशारा दिला होता. सुरवातीला काँग्रेसच्या बाकांकडे पहातच त्यांनी ‘मी सभापती असून हे माझे सभागृह आहे. येथे सभागृहाच्या नियमांनुसारच काम चालेल’ असे म्हटले. मात्र उदयनराजे यांनी दिलेल्या ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरुन महाराष्ट्रात नवे वादंग आणि पक्षीय राजकारण सुरू झाले. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप नेतृत्वाने राज्यातील नेतृत्वामार्फत उदयनराजे यांना ‘या वादावर लगेचच्या लगेच खुलासा करा,’ असा निर्देश दिला. त्यानंतर त्यांना तातडीने पत्रकार परिषद घ्यावी लागली. 

उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना, ‘‘यात शिवरायांचा अपमान झालेला नाही व तसे म्हणणेही हास्यास्पद आहे असे सांगितले. काल जे झालेच नाही ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण भरपूर झाले आहे. यापुढे ते होऊ नये. नायडू यांचे वर्तन चुकीचे नव्हते. मी शिवाजी महाराजांचा वंशज आहे. त्यांचा अपमान झाल्याचे जरा जरी जाणवले असते तरी मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता. माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मी महाराजांचा अपमान ऐकून तरी घेतला असता का? आदरणीय शरद पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा.’’ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावरून भाजपवर टीका करणारे शिवसेना नेते संजय राऊत हे महान व्यक्ती आहेत. त्यांना ओढाओढीशिवाय दुसरे काही माहितीच नाही, अशा शब्दांत उदयनराजे यांनी टीका केली. 

नायडूंचेही स्पष्टीकरण 
या वादाला राजकीय रंग येत असल्याचे पाहून स्वतः सभापती नायडू यांनी दुपारी चारवाजता ट्विट करून स्पष्टीकरण केले. त्यांनी म्हटले की, ‘‘मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा खंबीर प्रशंसक व माता भवानीचा उपासक आहे. शपथ घेतेवेळी असलेल्या सभागृहाच्या प्रस्थापित नियमांची व घोषणा देता येत नाहीत याची मी फक्त सदस्यांना आठवण करून दिली. कोणाबद्दलही अजिबात अनादर (दाखविलेला) नाही.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Udayan Raje Bhosale revealed