Loksabha 2019 : 'खरे' नाही, तरी 'बरे' बोला; अडवानी, जोशींकडून शहांची अपेक्षा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 एप्रिल 2019

"संकल्पपत्रा'तही नाही 
भाजपचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा जाहीर होण्याच्या समारंभात अडवानी व जोशी व्यासपीठावर काय; पण श्रोत्यांतही नाहीत असा 1980 पासूनचा पहिला कार्यक्रम आज पार पडला. अडवानी व जोशी यांच्या छायाचित्रांनाही पक्षाच्या संकल्पपत्रात स्थान मिळालेले नाही. आजच्या कार्यक्रमात संसदीय मंडळातील नितीन गडकरी यांची अनुपस्थितीतही अनेकांना खटकली. गडकरी यांनी तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर "जो घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार' यासह अनेक स्फोटक वक्तव्ये केली होती, त्यामुळे ते पक्षनेतृत्वाच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेल्याचे समजते. 

नवी दिल्ली : भाजपचे संस्थापक लालकृष्ण अडवानी व मुरलीमनोहर जोशी यांची पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. चर्चेचा सारा तपशील कळू शकला नाही, तरी किमान लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी दोघांनी भाजपच्या वर्तमान सर्वेसर्वा नेतृत्वाबद्दल "खरे' नाही तरी "बरे' बोलावे वा मौनव्रत सुरू ठेवावे, अशी "नम्र अपेक्षा' दोघाही ज्येष्ठांच्या कानावर घालण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. 

संघात असलेली 75 वर्षांची निवृत्तीची अट भाजपमध्ये केवळ कर्नाटकातील बी. एस. येडियुरप्पा यांच्यासाठी शिथिल करणाऱ्या पक्षनेतृत्वाने लोकसभेवेळी मात्र अडवानी व जोशी यांच्यासह सुमित्रा महाजन, कलराज मिश्रा, बी. सी. खंडुरी, कारिया मुंडा आदींची तिकिटे कापली. यातील जोशी व सुमित्रा महाजन यांनी संयत शब्दांत नाराजी व्यक्त केली. मात्र, अडवानी यांनी थेट ब्लॉगच लिहून भाजपच्या संस्कृतीचे पाठ देऊन आरसा दाखविला. भाजपला सत्तेचा सोपान दाखविणाऱ्या व एकेकाळी नरेंद्र मोदी यांची भक्कम पाठराखण करणाऱ्या अडवानींच्या ब्लॉगची दखल राष्ट्रीय व जागतिक माध्यमांनी घेतल्यामुळे भाजप सरकारच्या नेतृत्वात अस्वस्थता पसरली. कॉंग्रेसकडून याचे भांडवल करण्याच्या प्रयत्नाला जनतेकडून दाद मिळत असल्याचे लक्षात आल्यावर ही अस्वस्थता अधिकच वाढली. याआधी रामलाल वा विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून साऱ्या वरिष्ठांना "आता पुरे' असा मेसेज देण्यात आला होता. मात्र, अडवानींच्या ब्लॉगनंतर शहा यांनीच दोघांच्या घरी पायधूळ झाडावी अशी शक्कल लढविण्यात आली व त्या योजनेनुसार शहा दोघांकडेही पोहोचले. 

"संकल्पपत्रा'तही नाही 
भाजपचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा जाहीर होण्याच्या समारंभात अडवानी व जोशी व्यासपीठावर काय; पण श्रोत्यांतही नाहीत असा 1980 पासूनचा पहिला कार्यक्रम आज पार पडला. अडवानी व जोशी यांच्या छायाचित्रांनाही पक्षाच्या संकल्पपत्रात स्थान मिळालेले नाही. आजच्या कार्यक्रमात संसदीय मंडळातील नितीन गडकरी यांची अनुपस्थितीतही अनेकांना खटकली. गडकरी यांनी तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर "जो घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार' यासह अनेक स्फोटक वक्तव्ये केली होती, त्यामुळे ते पक्षनेतृत्वाच्या ब्लॅक लिस्टमध्ये गेल्याचे समजते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president Amit Shah meet LK Advani and Murli Manohar Joshi