खोटे बोलणे हे एकच कॉंग्रेसचे काम : नड्डा 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 17 September 2020

नड्डा यांनी सांगितले, की सध्याचा जीवनावश्‍यक वस्तू कायदा १९५५ चा आहे. तेव्हाच्या तुलनेत आता कृषी उत्पादनाचे प्रमाण खूप वाढले आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागाबद्दल अपवादाच्या परिस्थितीत हा कायदा करावा लागत आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, दूरदृष्टीने आणलेल्या तीन विधेयकांच्या अध्यादेशांना कॉंग्रेसने आधी पाठिंबा दिला होता. मात्र आता संसदेतील मंजुरीवेळी हा पक्ष राजकारणापोटी विरोध करत आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. 

कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणुकीची आणि कंत्राटी शेतीची तरतूद नव्या विधेयकात असली तरी शेतीची मालकी शेतकऱ्यांकडेच राहील व तिला कोणी धक्का लावू शकत नाही. कॉंग्रेस या मुद्यावर जनतेशी खोटे बोलत आहे, असे सांगून नड्डा म्हणाले, की कॉंग्रेस या तीन विधेयकांना आता विरोध करून शेतकऱ्याचे अहीत करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या पक्षाचा दुतोंडीपणा जगासमोर आला आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे व खोटे बोलणे एवढेच काम कॉंग्रेसकडे शिल्लक राहिले आहे, अशीही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, की जीवनावश्‍यक वस्तू कायदादुरूस्ती, व्यापार व वाणिज्य (संवर्धन- सुविधा) व शेतकरी करार -सशक्तीकरण व संरक्षण (कंत्राटी शेती) ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची आहेत. सरकारने याबाबतचे अध्यादेश आणण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार तज्ज्ञांशी चर्चा केली. कॉंग्रेसने तिन्ही अध्यादेशांना जाहीर पाठिंबा दिला होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नड्डा यांनी सांगितले, की सध्याचा जीवनावश्‍यक वस्तू कायदा १९५५ चा आहे. तेव्हाच्या तुलनेत आता कृषी उत्पादनाचे प्रमाण खूप वाढले आहे. खासगी क्षेत्राच्या सहभागाबद्दल अपवादाच्या परिस्थितीत हा कायदा करावा लागत आहे. व्यापार व वाणिज्य कायद्यामुळे शेतकरी बाजार समित्यांच्या बाहेरही आपली उत्पादने विकू शकतील. सध्याचा दर व भविष्यातील दराचा अंदाजही त्यांना मिळू शकेल. शेतकरी सशक्तिकरण व संरक्षण विधेयकात कंत्राटी शेतीची तरतूद असली तरी शेतीची मालकी शेतकऱ्यांकडेच राहणार, याची काळजी घेण्यात आली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president J. P. Nadda criticized the Congress

Tags
टॉपिकस
Topic Tags: