‘यूपीए’ सरकार निष्क्रियच होते; भाजपचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘यूपीए’ सरकार निष्क्रियच होते; भाजपचा हल्लाबोल
‘यूपीए’ सरकार निष्क्रियच होते; भाजपचा हल्लाबोल

‘यूपीए’ सरकार निष्क्रियच होते; भाजपचा हल्लाबोल

नवी दिल्ली : यूपीए सरकारला देशाच्या अखंडतेचेही चिंता नव्हती असे टीकास्त्र सोडताना भाजपने ते सरकारच निष्क्रिय व नालायक होते असे म्हटले आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी ‘१० फ्लॅश पॉईंट,२० वर्षे‘ पुस्तकात मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर न देणे हा तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारच्या टोकाच्या कमकुवतपणाचे द्योतक होते, असा घरचा आहेर दिला. हाच धागा पकडून भाजपनेही तत्कालीन यूपीए सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी हे यावर मौन सोडतील का, असाही सवाल भाजपने विचारला.

मनीष तिवारी हे जी-२३ गटाचे सदस्य आहेत. पंजाब निवडणुकीच्या तोंडावर तिवारींसह अनेक कॉंग्रेस नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नव्या पक्षाच्या किंवा आम आदमी पक्षात जाण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा भाजप गोटात आहे. तिवारी यांनी आपल्या पुस्तकात डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या धोरणाचे वाभाडे काढल्याने भाजपच्या हाती नवे कोलीत मिळाले आहे. यूपीए सरकारने राष्ट्र सुरक्षेलाही पणाला लावले, हे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, की तिवारी यांनी आपल्या पुस्तकात काहीही चुकीचे लिहिलेले नाही. यूपीए सरकारला देशाच्या अखंडतेचेही पर्वा नव्हती, हे नव्याने पुढे आले आहे. या पुस्तकात जे लिहिले त्यावर सोनिया व राहुल गांधी मौन सोडतील का व कधी, हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्या वेळी देशाच्या शूर जवानांना मुक्तहस्ते कारवाई करण्याची परवानगी का दिली नाही ? आपले लष्कर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे मुंबई हल्ला करणाऱ्या पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची परवानगी वारंवार मागत होते. पण ती का दिली नाही हे सोनिया गांधी सांगतील का? भाटिया म्हणाले, की राष्ट्र सुरक्षेच्या मुद्यावर यूपीए सरकार बेपर्वा होते हे भाजपने अनेकदा म्हटले आहे. संयम म्हणजे सशक्तपणाची खूण नाही तर तो कमकुवतपणा आहे व कॉग्रेसने पाकिस्तानबाबत हे धोरण स्वातंत्र्यानंतर वारंवार दाखविले आहे. या पक्षाला देशाच्या अखंडतेचेही काळजी नव्हती व नाही हे प्रत्येक भारतीय पाहात होता.

कॉंग्रेसचा नवा ‘कबूलनामा’

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल आदींप्रमाणेच तिवारी यांची मते कॉंग्रेसच्या अपयशाचा नवा ‘कबूलनामा‘ आहे व हे पहिल्यांदाच घडलेले नाही. या पक्षाचे नेतृत्व सध्या ज्यांच्याकडे आहे त्यांच्या मर्यादा गेली अनेक वर्षे जगजाहीर आहे, तरी कॉंग्रेस नेतृत्वाला याचा स्वीकार करणे अवघड आहे. आता २०२४ जवळ येत जाईल, तसे तिवारी यांच्याप्रमाणे अनेक नेतेही स्वपक्षाच्या नेतृत्वाचे वाभाडे काढतील, असाही भाजप नेत्यांचा होरा आहे. सध्याचे कॉंग्रेस नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक निर्णयात तिळाएवढा दोष काढतात व पण स्वतःचे व्यक्तित्व व नेतृत्वातील बेलफळा एवढे मोठमोठे दोष त्यांना दिसत नाहीत, असे एका भाजप नेत्याने सांगितले.

loading image
go to top