आता भाजपचे लक्ष्य झारखंड अन्‌ दिल्ली

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 23 October 2019

आजच्या बैठकीत महाराष्ट्र व झारखंड या राज्यांच्या निकालांबाबत व नंतर भाजपच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांबाबत शहा यांनी विशेष सूचना केल्या.

नवी दिल्ली - महाराष्ट्र व हरियाना निवडणुकांच्या एक्‍झिट पोलच्या धक्‍क्‍यातून विरोधी पक्ष सावरले नसताना सत्तारूढ भाजप नेतृत्वाने राजधानी दिल्लीसह झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग दिला. 

पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज पक्ष मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेऊन आगामी रणनीतीबाबत व कार्यक्रमांबाबत चर्चा केली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भूपेंद यादव यांच्यासह सर्व महासचिव उपस्थित होते.

शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला संघाचे प्रतिनिधी बी. एल. संतोष, कैलास विजयर्गीय, राम माधव, मुरलीधर राव, अरुण सिंह व अशोक जैन हे सातही राष्ट्रीय सरचिटणीस उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या आगामी संघटनात्मक निवडणुकांचा आढावा, महात्मा गांधी पदयात्रा याबाबतही आढावा चर्चा करण्यात आली. गांधी पदयात्रा कार्यक्रमात पक्षाचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, केंद्र व राज्यांतील भाजप मंत्री यांनी दररोज १० किलोमीटर याप्रमाणे १५-१५ दिवस पदयात्रा करावयाच्या आहेत. याशिवाय आजच्या बैठकीत दिल्ली व झारखंडच्या निवडणुकांच्या तयारीचाही आढावा शहा यांनी घेतला. केजरीवाल यांनी घेतलेल्या निणर्यांमुळे भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. वीज व पाणीबिलातील कपात व बसमध्ये महिलांना मोफत प्रवास या त्यांच्या घोषणांनी भाजपच्या कलम ३७० च्या प्रचारावरही मात केल्याचे जाणकार मानतात. यादृष्टीने आपच्या आव्हानाला सामोरे जाताना कोणती नवीन रणनीती वापरावी यावर शहा यांनी सरचिटणीसांकडून काही सूचना मागविल्या आहेत.

संयमाने प्रतिक्रिया देण्याची सूचना
आजच्या बैठकीत महाराष्ट्र व झारखंड या राज्यांच्या निकालांबाबत व नंतर भाजपच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांबाबत शहा यांनी विशेष सूचना केल्या. लोकसभेवेळी एक्‍झिट पोलचा कौल येताच काँग्रेस, तेलुगू देसम आदी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण दिल्ली कशी डोक्‍यावर घेतली होती, याचे वर्णन शहा यांनी केले व निकालानंतर संयमाने प्रतिक्रिया देण्याच्या सूचना दोन्ही राज्यांतील मंत्री-प्रवक्‍त्यांना देण्याबाबतही कानमंत्र दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP targets Jharkhand and Delhi